गुवाहाटी : वृत्तसंस्था
आसाममधील पूरस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी राज्यातील १२ जिल्ह्यांमधील सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत, अशी माहिती अधिका-यांनी रविवारी दिली. सरकारी बुलेटिननुसार, आतापर्यंत पुर आणि भूस्खलनामुळे एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ६ जण भूस्खलनात मरण पावले आहेत.
श्रीभूमी हा आसाममधील सर्वाधिक पूरप्रभावित भाग असून, १.९३ लाखांहून अधिक लोक तिथे पुराच्या विळख्यात आहेत. इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये हैलाकांडी येथील ७३७२४ तर कछार येथील ५६३९८ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
राज्यातील एकूण ३३७३५८ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. ४१ सर्कल व ९९९ गावे प्रभावित झाली आहेत. ३६,००० हून अधिक नागरिकांनी १३३ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. ६८ मदत वितरण केंद्रांतून गरजूंना मदत पोहचवली जात आहे. पुरामुळे १२६५९ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. २ जिल्ह्यांमध्ये शहरी पूरामुळे २८४ लोक प्रभावित झाले आहेत. काझीरंगा नॅशनल पार्क व पोबितोरा वन्यजीव अभयारण्य अजूनही पाण्याखाली आहे.
ब्रह्मपुत्रा नदीसह प्रमुख नद्यांचा पूर सध्या ओसरत असला तरी काही नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर आहेत. धुब्री येथे ब्रह्मपुत्रा, धरमटुल येथे कोपिली, बीपी घाट येथे बराक, आणि श्रीभूमी येथे कुशियारा धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.