इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाचे वातावरण असतानाच इराणला भूकंपाचा धक्का बसला. इराण आणि इस्रायलने शनिवारी पुन्हा एकमेकांवर हल्ला केला. त्याच्या एक दिवस आधी इराणने अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत कुठल्याही वाटाघाटी करणार नाही, असे स्पष्ट केले होते. युरोपीय देश दोन्ही बाजूंमध्ये शांतता चर्चेसाठी सतत प्रयत्न करत आहेत.
उत्तर इराणच्या सेमनान प्रदेशात ५.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. तस्रिम वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सेमनानच्या नैऋत्येस २७ किलोमीटर अंतरावर १० किलोमीटर खोलीवर भूकंप झाला. या भूकंपामुळे आता इराणने एखादी अण्वस्त्राची चाचणी केली आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण हा भूकंप अंतराळ संकुल आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या शहराजवळ असल्याने नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत. इराणी सैन्याद्वारे चालवले जाणारे सेमनान स्पेस सेंटर आणि सेमनान क्षेपणास्त्र संकुल येथेच आहे.
इराणमध्ये दरवर्षी २,१०० भूकंप
भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही फक्त किरकोळ नुकसान झाले. संघर्षग्रस्त हा देश जगातील सर्वात भूकंप प्रवण क्षेत्रातील देशांपैकी एक आहे, कारण इथं अल्पाइन-हिमालयीन भूकंपीय पट्ट्यावर वसलेला आहे, जिथे अरबी आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. इराणमध्ये दरवर्षी साधारणपणे २,१०० भूकंप होतात ज्यापैकी १५ ते १६ भूकंप ५.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे असतात. २००६ ते २०१५ दरम्यान देशात ९६,००० भूकंप झाले. अण्वस्त्र चाचणीवेळी भूमिगत स्फोटांमुळे आणखी भूकंप होऊ शकतात. भूकंपशास्त्रज्ञांनी केलेल्या विश्लेषणाने अणुचाचण्यांबद्दलच्या चर्चा खोडून काढल्या आहेत.