मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला. विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र विरोधकांचे हे सारे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर निवडणुकीच्या निकालाविरोधात कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी देखील ईव्हीएमविरोधात पुण्यातील भिडे वाड्यात आत्मक्लेष आंदोलन सुरू केले होते. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडले आहे.
याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. कारण ते वायफायला किंवा ब्लूटूथला कनेक्ट करता येत नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त मतदान झाले नाही. परळीत काही लोकांनी गोंधळ घातला यावेळी पोलिसांनीही गोंधळ घालणा-यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.