जिंतूर : नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, गतिमान व निश्चित कालमर्यादेत मिळाव्यात या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा जिल्हाधिका-यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी म्हणून लाहोटी यांच्या कार्यक्षेत्रात सेलू आणि जिंतूर या दोन महत्त्वाच्या तालुक्यांचा समावेश आहे. विशेषत: जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यातील सर्वात विस्तृत व कामकाजाच्या दृष्टीने आव्हानात्मक तालुक्यांपैकी एक मानला जातो. मोठा भौगोलिक विस्तार, विविध प्रशासकीय कामांचा मोठा व्याप आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा या सर्व बाबींचा प्रभावीपणे सामना करत त्यांनी प्रशासनाची गती कायम ठेवली आहे.
लाहोटी यांनी लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांना विहित मुदतीत सेवा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभ, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळू लागल्या आहेत. परिणामी, प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
जिल्हाधिका-यांनी लाहोटी यांच्या कामगिरीचे कौतूक करताना सांगितले की, लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही प्रशासनाच्या विश्वासार्हतेची पायाभूत गरज आहे. लाहोटी यांचे कार्य इतर अधिका-यांसाठी प्रेरणादायी आहे. या गौरवामुळे प्रशासनातील सकारात्मक कार्यपद्धतीला चालना मिळणार असून नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. उपविभागीय अधिकारी लाहोटी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
















