17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरएक हजार मुलांमागे ९३८ मुली

एक हजार मुलांमागे ९३८ मुली

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जन्मलेल्या बालकांच्या संख्येवरुन जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण काढले जाते. नुकतेच लिंग गुणोत्तर प्रमाण काढण्यात आले. त्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३८ वर आली आहे. ती धोक्याच्या वळणावर आहे. वंशाचा दिवा मुलगाच हवा ही मानसिकता अद्यापही कायम असल्याचेच या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. एक हजार मुलांमागे ६२ मुली कमी आहेत. मुला-मुलींचे हे विषम प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले तर असंख्य सामाजिक प्रश्न जन्म घेऊ शकतात हे नाकारत येणार नाही.
वंशाचा दिवा मुलगाच असावा, अशी मानसिकता असणा-यांनी जन्माअधिच मुलींच्या नरडीला नख लावल्याचे दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यात काही भागात बेकायदा गर्भलिंग निदान सुरु असल्याची चर्चा आहे. याचा फायदा अनेकजण उचलत असून कर्नाटकात तपासणी करुन महाराष्ट्रात गर्भपात तर महाराष्ट्रात तपासणी करुन कर्नाटकात गर्भपाताची नवी परंपरा सुरु असल्याचेही सांगणयात येत आहे. याचा फटका मुलींची संख्या कमी होण्यात झाला आहे. नुकतेच काढण्यात आलेल्या लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातून आरोग्य यंत्रणेला सूचक इशाराच ठरत आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाचा हट्ट धरणा-या कुटुंबात एक किंवा दोन मुलींना जन्म देऊन तिस-यांदा गरोदर राहिलेल्या महिलेवर मोठे दडपण असते.
यातूनच महिला व कुटूंबाकडून माहिती लपवण्यात येते. अंगणवाडी तसेच आरोग्य केंद्रातून देण्यात येणा-या सुविधांचा लाभ घेतला जात नाही. यामुळे असुरक्षित बाळंतपण व अन्य कारणांनी माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढते.  खरे तर स्त्रीभ्रुण हत्या बेकायदेशीर असताना वंशाला दिवा म्हणुन मुलगा व मुलगी समानच असल्याचे पटवून देण्यात येत असले तरी या स्थितीत मुलींची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या वेळीच आटोक्यात न आल्यास पुन्हा ती नियंत्रणास येण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR