24.9 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचारी जाणार संपावर?

एसटी कर्मचारी जाणार संपावर?

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी एसटी कर्मचा-यांनी राज्यभरातील आगार कार्यालयांबाहेर आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास होळीच्या तोंडावर एसटी संप होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होऊ शकतात.

होळी सणामुळे अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एसटी कर्मचा-यांनी संप पुकारल्यास ग्रामीण भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. एसटी ही अनेक प्रवाशांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी असल्याने संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होईल.

२०१८ पासूनची थकबाकी अद्याप प्रलंबित
एसटी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू आहे. मात्र, २०१८ पासूनचा महागाई भत्त्याचा फरक आणि अन्य थकबाकी अद्याप मिळालेली नाही. न्यायालयाने थकबाकी देण्याचा आदेश दिला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सध्या सरकारी कर्मचा-यांना ५३ टक्के महागाई भत्ता दिला जात असला, तरी एसटी कर्मचा-यांना केवळ ४३ टक्के भत्ता मिळत आहे.

एसटी कर्मचा-यांच्या मुख्य मागण्या
५३ टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा.
२०१६ ते २०२१ पर्यंतच्या घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी अदा करावी.

जाचक शिस्त आणि आवेदन प्रक्रिया रद्द करावी.
आरटीओ विभागाकडून चालकांवर होणारी अन्यायकारक दंडात्मक कारवाई थांबवावी.
सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास एसटी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारकडून पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR