नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत ठरलेल्या योजनेनुसार नियोजित लक्ष्यांवर नेमका हल्ला करण्यात आला. ज्यांनी आमच्या निर्दोष नागरिकांना मारले, आम्ही केवळ त्यांनाच मारले आहे, अशी स्पष्टोक्ती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली.
सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. ‘भारताने आपल्या भौगोलिक सीमांचे उल्लंघन न करता हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरला आहे. सखोल विचार करून आणि नेमक्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली’, असे ते म्हणाले.
‘दहशतवाद्यांचे मनोधैर्य तोडणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे, एवढ्यापुरतेच ‘ऑपरेशन सिंदूर’ मर्यादित होते. सतर्कता, नेमकेपणा आणि संवेदनशीलतेने ही मोहीम पार पाडली,’ असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
‘हनुमानाचा आदर्श घेतला’
‘सीतेचा शोध घेत असताना हनुमानाने केवळ अशोक वाटिका उद्ध्वस्त केली होती. तोच आदर्श ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना आम्ही ठेवला होता. निष्पाप नागरिकांना ज्यांनी मारले, आम्ही केवळ त्यांनाच मारले आहे,’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तानने बुधवारी पाकिस्तानमधील भारताच्या उपउच्चायुक्तांना बोलावून भारतीय हल्ल्यांविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक ठिकाणी भारताने केलेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र निषेध नोंदवण्यासाठी भारताच्या उपउच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात पाचारण केल्याचे पाकच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यांत महिला आणि मुलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे त्यात म्हटले आहे. ‘भारताचे उघड आक्रमक कृत्य पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे सांगण्यात आले.