23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाला लोळवले, भारत उपांत्य फेरीत

ऑस्ट्रेलियाला लोळवले, भारत उपांत्य फेरीत

रोहितची जोरदार फटकेबाजी
सेंट लुशिया : वृत्तसंस्था
ट्रेव्हिस हेड पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरत होता. पण जसप्रीत बुमराहने मोक्याच्या क्षणी हेडला बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी मात करीत सेमी फायनलमध्ये धडक मारली.

रोहित शर्माच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने २०५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने हेडच्या फलंदाजीच्या जोरावर चांगला पाठलाग केला. पण त्यांना विजय साकारता आला नाही. या पराभवासह ऑस्ट्रेलिया आता वर्ल्ड कपच्या बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताने दमदार कामगिरी करत या सामन्यात ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी विजय साकारला.

पहिल्याच षटकात अर्शदीपने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का देत अखेरच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला ६ धावावर बाद केले. त्यानंतर कर्णधार शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने जोरदार फटकेबाजी करीत दुस-या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. त्याचवेळी अक्षर पटेलने मार्शची अफलातून कॅच पडकली आणि २८ चेंडूंत ३७ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेलही १९ धावांवर माघारी परतला. तसेच मार्कस स्टॉइनिसही दोन धावांवरच माघारी परतला. त्याचवेळी हेडने अर्धशतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. पण हेडला जसप्रीत बुमराहने बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. हेडने ४३ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७६ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर भारताने पकड मजबूत केली आणि २४ धावांनी शानदार विजय मिळविला.

तत्पूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या धडाकेबाज ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना या वर्ल्ड कपमध्ये प्रथमच दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ४१ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ९२ धावांची दमदार खेळी साकारली.

रोहितचा विक्रम
रोहित शर्माने करो या मरो सामन्यात ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली आणि इतिहास रचला. जे कोणालाही जमले नाही, ते रोहितने करून दाखवले. मिचेल स्टार्कच्या एका षटकात तर ४ षटकार आणि १ चौकार लगावला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला आणि टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील २०० षटकार लगावणारा तो जगभरातील पहिलाच खळाडू ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR