निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा शहरासह तालुक्यात सलग दोन दिवस पावसाने कहर केला आहे . मुसळधार झालेल्या पावसाने अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औराद शहाजानीसह परिसरात बुधवारी मध्यरात्री मुसळधार झाला.औराद येथील हवामान केंद्रात १०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान मापक मुकरम नाईकवाडे यांनी दिली. जोरदार झालेल्या पावसाने तेरणा नदीत वाळू उपसा करणारी बोट पाण्याच्या प्रवाहाने वाहत येऊन औराद शहाजानी येथील उच्चस्तरीय बंधा-यात अडकली आहे.
निलंगा शहरासह तालुक्याला सोमवार व मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे औराद येथील हैदराबाद ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले. महामार्गावरील शेळगी मोडवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने पावसाच्या पाण्याला अवरोध निर्माण होऊन रस्त्यावरचे पाणी महाराष्ट्र विद्यालयात शिरले आहे. मागील वर्षीही पावसाचे पाणी महाराष्ट्र विद्यालयात शिरले होते. तेव्हा कंत्राटदाराने तात्पुरती गटार काढून पाणी काढून दिले होते. मात्र ती गटार बुजल्याने यंदा पुन्हा पावसाचे पाणी शाळेत शिरले. अनेक शेतातील बांध फुटले आहेत, माती वाहून गेली आहे. अनेकांच्या शेतामध्ये पाणी थांबले आहे. सलग झालेल्या पावसामुळे जमीनी भिजल्या असून पेरणीयोग्य पाऊस झाला आहे . त्यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. त्याचबरोबर सोमवारी निलंगा तालुक्यातील मदनसूरी येथे एका दिवसात १०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात गावातील दोन घरांच्या भिंती पडल्या आहेत तर अनेकांच्या शेतातील बांध फुटून जमीनी वाहून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
याबाबतचे औराद शहाजानी व मदनसुरी येथील नुकसानीचे पंचनामे तलाठी बालाजी भोसले यांनी केले आहेत. त्यामुळे तेरणा नदीला पाणी आले. त्यातच मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या १०९ मिलीमीटर पावसाने तेरणा नदीला पूर आला आहे. औराद शहाजानी येथील उच्चस्तरीय बंधा-यातील पाण्याची पातळी वाढल्याने सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे की नदी संपूर्ण पात्र भरून वाहत आहे.
पाण्याच्या या तीव्र प्रवाहामध्ये वाळू उपसा करणारी बोट वाहून येऊन बंधा-याच्या दरवाज्यात अडकली असून तात्काळ ती बोट काढणे गरजेचे आहे अन्यथा तो दरवाजा बंद करता येणार नाही. त्याचबरोबर नदी संपूर्ण पात्र भरून वाहत असल्याने नदीलगत असलेल्या औराद शहाजानी शासकीय विश्रामगृहाच्या तटबंदीची भिंत पाण्याच्या प्रवाहाने ढासळली आहे. यादरम्यान कसलीही जिवीतहानी झाली नाही.