पाथरी : शहरात काल शुक्रवारी दुपारी कापूस व्यापारी पुरूषोत्तम सोमानी यांचे अपहरण झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या सिनेस्टाईल अपहराणामुळे पोलिसांपुढे आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहीले आहे. दरम्यान आरोपींनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटले असून आपल्या पत्नीकडून मोबाईलवर ९० हजार रुपये मागवून घेतले असल्याची तक्रार सोमानी यांनी शनिवार, दि.२२ ऑगस्ट रोजी पाथरी पोलिसांत दिली असून या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यापारी सोमानी हे शुक्रवारी दुपारी सोने गहाण ठेवण्यासाठी मुथूट फायनान्सकडे जात होते. रेस्ट हाऊसजवळ पांढ-या रंगाच्या इनोव्हा गाडीतून आलेल्या चार आरोपींनी त्यांना स्कुटीसह वाटेतच अडवले. त्यांना बळजबरीने गाडीत कोंबून लोहा (जि. नांदेड) येथे नेले. तिथे आरोपींनी त्यांना मारहाण करत खिशातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लुटला. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आपल्या पत्नीमार्फत मोबाईलवर ९० हजार रुपये फोन-पे वरुन घेतले. तसेच उद्या आणखी खतम करण्याची धमकी देऊन सोडून दिल्याची फिर्याद सोमानी यांनी पाथरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
या गंभीर प्रकारानंतर शनिवारी पहाटे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रंगनाथ भुरे, महादू महागावकर (दोघे रा. लोहा, जि. नांदेड) आणि २ अनोळखी इसम अशा ४ जणांविरुद्ध नोंद झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरण आणि लुटमारीच्या प्रकारामुळे व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाथरी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
















