रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय झाला आहे. मात्र या विजयानंतर कोकणात महायुतीच्या नेत्यांमध्येच बॅनर वॉर सुरु झाले आहे. लोकसभा निवडणुकीआधी तिकीटावरुन सुरु असलेल्या राणे विरुद्ध सामंत वादाने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यातूनचा आता दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र यामुळे महायुतीमधला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेबाबत धक्कादायक विधान केले आहे. कोकणातून शिवसेना मी संपवली असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना संपवल्याचा दावा केला. आता यापुढे कोणाला थारा देणार नाही. आमच्या समोर कोणी आडवे कोण आले तर, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता बॅनरवॉर पुरते असलेला हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
आम्ही सांगतो ना आम्हीच येणार ते. आम्ही इथे आहोत आणि राहणार जसे केंद्रात नरेंद्र मोदी हे तिस-यांदा आले आणि पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. जे कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढेही जाऊ. त्यांचा पायच बाजूला केला मी. ही भाषा बोलू नये पण सगळे आडवे झालेत. कोकणात तर आम्ही साफ केले आहे. इथे कोणाला शिरू देणार नाही असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
दरम्यान, माजी खासदार नीलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूवर आरोप करत निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता. तसेच रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. दोन्ही मतदारसंघ भाजपचे असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले होते. आता नारायण राणे यांनी ही दोन्ही मतदारसंघाबाबत भाष्य केले आहे.
येणा-या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर भाजपचाच आमदार असेल त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी मात्र निमित्त आहे असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.