लातूर : योगिराज पिसाळ
लातूर जिल्ह्यातील दर्जेदार द्राक्षांना विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. जिल्ह्यातून विदेशात द्राक्ष निर्यातीसाठी १५० शेतक-यांनी आपेडाकडे नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विदेशात द्राक्ष निर्यात करणा-या शेतक-यांची नोंदणी वाढली आहे. सध्या द्राक्षाचे पीक हे आकार वाढण्याच्या व कलर तयार होण्याच्या अवस्थेत आहे. या वर्षी निसर्गानेही द्राक्ष पिकासाठी चांगली साथ दिल्याने शेतकरीही द्राक्ष बांगांकडे काटेकोर व कटाक्षाने लक्ष देत असल्याने उत्पादनही दर्जेदार होणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात क्रिमसन द्राक्षांची युरोपियन देशात निर्यात होणार आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा या फळपिकांची व विविध भाजीपाला पिकांची व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात १३८.१५ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिकांच्या बागा बहरल्या आहेत. विदेशात द्राक्षांची निर्यात करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यत १५० द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी ग्रेपनेट प्रणालीवर थॉमसन सिडलेस, टू ए क्लोन, सोनाका, माणीकचमन, क्रिमसन सिडलेस, फ्लोम सिडलेस या द्राक्ष पिकांची नोंदणी केली आहे. यात १३५ शेतक-यांनी नूतणीकरण केले आहे तर १५ शेतक-यांची नवीन भर पडली आहे. गेल्या वर्षी २१२ शेतक-यांनी आपेडाकडे द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतक-यांचा विदेशात द्राक्ष निर्यातीसाठी कल वाढला आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मोजक्या स्वरूपात पाणी सध्या उपलब्ध आहे. ३० ते ४० शेतक-यांनी मिळून सामूहिक शेततळे घेतल्याने या शेततळ्यातील पाण्याचा व विहीर, बोअरच्या पाण्याच्या काटकसरीने शेतकरी द्राक्षांच्या बागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत आहेत.