शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
या वर्षीच्या खरीप हंगामासाठीची पेरणी पूर्व तयारी पूर्ण झाली असून खरिप हंगामासाठी तालुक्यात तीन हजार मेट्रीक टन खत उपलब्ध झाला आहे. यावर्षी २६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार आहे. तालुक्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे तालुका कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून पाऊस सदृश परिस्थिती असल्याने मृग नक्षत्रातील पेरण्या होतील असे शेतक-यातून बोलले जात आहे. पेरणी पूर्व मशागत झाली असल्याने शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला असून शेतकरी बी- बियाणांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त झाले आहेत. त्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक-याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिरूर अनंतपाळ तालुका हा प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जातो.३१ हजार ७०० हेक्टर एवढे क्षेत्र असलेल्या या तालुक्यात २८ हजार ३०० हेक्टर एवढे क्षेत्र पेरणी योग्य आहे.
यात यावर्षी २६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून यात सर्वाधिक २३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन चा पेरा होणार आहे. सोयाबीन खालोखाल तुर, मुग, उडीद, ज्वारीचा तर शिल्लक क्षेत्रावर इतर पिकांचा पेरा होणार आहे. शिरूर अनंतपाळ तालुका हा सर्वाधिक सोयाबीन पिकविणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्या खालोखाल तूर व ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.