पुणे : प्रतिनिधी
राज्यात आचारसंहिता लागली असताना पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर रोकड घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी (दि.२१) सायंकाळी ताब्यात घेतले. यावर रोहित पवार यांनी शिंदे सरकारमधील आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीकास्त्र डागत खोकेबाजांना जनता घरी पाठवणार असे विधान केले आहे.
दरम्यान, या वाहनात ५ कोटींची ही रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालली होती? याबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी मोठी रक्कम असलेल्या पैशांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५- २५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार-झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
लोकसभेलाही सत्ताधा-यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणा-या खोकेबाजांना इथली जनता ‘ करुन डोंगर द-या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधा-यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही रोहित पवार यांनी सत्ताधा-यांना दिला.