नागपूर : राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना सुरू केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळत नवी नियमावली बनवली आहे. या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे, ही योजना वादात सापडली होती, अखेर या योजनेत काही बदल केले आहेत. त्यावरून आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच, या योजनेत तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी मलई खाल्ली आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला.
राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुरुवातीला राज्यातील बचत गटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. एकाची बाही दुस-याच्या शर्टाला, दुस-याचा खिसा तिस-याच्या पॅण्टला, अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे ही योजना वादात सापडली होती. आता, फडणवीस सरकारमध्ये ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत काही बदल केले आहेत. त्यावरून, आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर यांना लक्ष्य केले.
‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. राज्य सरकारने आता ती योजना स्क्रॅप केली आहे. या खात्याचे संबंधित मंत्री केसरकर यांनी त्यात मलई खाल्ली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच, धस साहेबांनी बीडची गुन्हेगारी व ‘परळी पॅटर्न’ समोर आणल्याचेही ते म्हणाले.