किल्लारी : वार्ताहर
लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध लागवड व तस्करीविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलिसांनी सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या गांजा शेती प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी कि ल्लारी पोलीस ठाणे गु.र.नं. २५३/२०२५, कलम ८(क), २०(ब)(क) अमली पदार्थ व मनप्रभावी पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात आरोपीने नांदुर्गा तांडा येथील स्वत:च्या शेतात बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ८० किलो वजनाचा व अंदाजे ८ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
दरम्यान, गुप्त माहितीदारामार्फत आरोपी रामराव दगडू पवार (रा. नांदुर्गा तांडा, ता. औसा, जि. लातूर) हा नांदुर्गा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती किल्लारी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष सूचना दिल्या असून, त्या अनुषंगाने जिल्हाभर प्रभावी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत फरार आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. ही यशस्वी कार्यवाही पोलिस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव, पोलिस अमलदार कृष्णा गायकवाड, बालाजी फावडे, दत्ता जाधव, रविशंकर करके, आकाश सरतापे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
















