नवी दिल्ली : वृत्तसंस्था
या वर्षीच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक होत आहे, यासाठी काँग्रेसने आधीपासूनच तयारी सुरू केली असून आता गुजरात काबीज करण्याची योजनाही आखली आहे. ६४ वर्षांनंतर गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन होणार आहे. एप्रिलमध्ये या कार्यक्रमाने विधानसभा निवडणुकीची तयारी औपचारिकपणे सुरू होईल.
गुजरातमध्ये जवळपास ३० वर्षांपासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. पक्षाने अनेक प्रयत्न करुनही त्यांना भाजपचा बालेकिल्ला जिंकता आला नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही निराशाजनक निकाल लागले. असे असूनही काँग्रेसने आतापासूनच मिशन २०२७ अंतर्गत गुजरात काबीज करण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी १९६१ मध्ये भावनगर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. आता ६४ वर्षांनंतर पुन्हा अधिवेशन होत आहे.
१९९५ पासून गुजरात विधानसभेत भाजप १०० हून अधिक जागा जिंकत आहे. २०१७ मध्ये काँग्रेसने भाजपचा विजय रथ ९९ वर रोखला होता. पण, २०२२ मध्ये भाजपला ५३ टक्के मतांसह १४८ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला केवळ १७ जागा जिंकता आल्या. काँग्रेसला ज्या प्रकारे एकामागून एक पराभवांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. आता अधिवेशनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणार आहे.