28.3 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeसंपादकीयघर फिरले की...

घर फिरले की…

गत १२ वर्षे तब्बल सलग १८ घरगुती कसोटी मालिका जिंकणा-या भारतीय क्रिकेट संघाचे न्यूझिलंडने पुरते गर्वहरण केले. मिचेल सँटनरच्या डावखु-या फिरकी मा-यासमोर भारताचे शेर पुरते ढेर झाले. यजमान संघाला गत १२ वर्षांत पहिल्यांदाच मायभूमीत कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की सहन करावी लागली. न्यूझिलंडने २-० अशा फरकाने तीन सामन्यांची कसोटी मालिका खिशात टाकली. न्यूझिलंडने भारतात ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. घरच्या मैदानावर खरपूस मार खाल्ल्यानंतर सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (डब्ल्यूटीसी) भारतीय संघ अग्रस्थानी असला तरी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय संघाच्या स्वप्नांचा पुन्हा एकदा चुराडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याआधी दोन वेळा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पराभूत झाला आहे. फिरकी सर्वोत्तमरीत्या खेळणारा संघ अशी भारतीय संघाची आजवर ख्याती होती. परंतु पुण्यातील दुस-या कसोटीत सँटनरने भारतीय फलंदाजांना डिस्को, कथ्थक, कुचिपुडी आदी नृत्याचे सर्व प्रकार करायला लावले. किवीज संघाचे ३५९ धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. पहिल्या डावात भारतीय संघ १५६ धावांत गारद झाला होता. दुस-या डावात यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजाच्या ४२ धावांच्या खेळीनंतरही भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला. किवीजनी ११३ धावांनी कसोटी जिंकली. सँटनरने ६ बळी घेतले. त्याने या कसोटीत एकूण १३ बळी घेत भारतीय फलंदाजीची लक्तरे काढली.

बंगळुरूमधील पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत संपुष्टात आला होता. तेथूनच भारताच्या गर्वहरणाची सुुरुवात झाली होती. पहिल्या कसोटीत भारताचा आठ विकेटस्नी पराभव झाला होता. त्यानंतर दुस-या कसोटीत ११३ धावांनी पुन्हा एकदा हार पत्करत भारताने २०१२-१३ नंतर पहिल्यांदाच मायदेशातील कसोटी मालिका गमावली. त्यावेळी इंग्लंडने भारताला धूळ चारली होती. यावेळी किवीजने भारताची १८ कसोटी मालिका विजयाची परंपरा खंडित केली. या दारुण पराभवानंतरही डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत ९८ गुणांसह भारत अग्रस्थानी कायम असला तरी पर्सेंटेज गुणांचा (६२.८२) त्याला मोठा फटका बसला आहे. या संदर्भात ऑस्ट्रेलिया (६२.५०) पर्सेंटेज गुणांसह भारतापेक्षा थोड्या फरकाने मागे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर मालिका भारताला जिंकावी लागणार आहे. तरच भारताचा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत खेळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

भारतीय खेळपट्ट्यांवर नेहमी भारतीय फिरकीपटूच वर्चस्व गाजवतात हा आजवरचा लौकिक होता, त्याला पहिल्यांदाच छेद मिळाला. परदेशी पाहुण्या फिरकीपटूने यजमानांच्या फलंदाजांवर हुकूमत गाजवण्याची गत काही वर्षांतील ही पहिलीच वेळ असावी. सध्या भारताला विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता आहे. सप्टेंबरमध्ये कसोटी मालिकांना सुरुवात झाल्यापासून रोहित, विराट सातत्याने अपयशी ठरत आहेत. रोहितने गत आठ डावात फक्त १०४ धावा काढल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. म्हणजे गत ७ डावांत तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. कोहलीने ८ डावांंत १८७ धावा काढताना फक्त एक अर्धशतकी खेळी केली आहे. या पराभवानंतर मी फारसा चिंतीत नाही असे रोहित शर्माने म्हटले आहे. गत १२ वर्षांत भारताने यशस्वी पताका फडकावली आहे. यावेळी रणनीतीनुसार खेळ करता आला नाही. एखाद्यावेळी संघावर नामुष्की ओढवते, परंतु त्यामुळे या पराभवाचे पोस्टमार्टेम करण्याची गरज नाही.

याच फलंदाजांनी या आधी भारताला अनेक कसोटी मालिका जिंकून दिल्या आहेत. मात्र पराभवाच्या कारणांचा नक्कीच शोध घ्यावा लागेल आणि त्यानुसार आमच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल असे रोहित म्हणाला, ही मालिका गमावल्यामुळे आम्ही निराश झालो आहोत, हे आमचे सांघिक अपयश आहे. जेव्हा आम्ही मालिका जिंकतो, त्यावेळी प्रत्येकजण यशाचे श्रेय घेत असतो. त्यामुळे मालिका गमावल्यानंतर प्रत्येकाने या पराभवाचे श्रेय घ्यायला हवे, या मालिकेत आम्ही खराब फलंदाजी केली असेही रोहित म्हणाला. भारतीय फलंदाज फिरकीपटूंना उत्तमरीत्या खेळतात हा आजवर जो समज होता तो आता इतिहासजमा झाला आहे असे म्हणावे लागेल नव्हे तो आता गैरसमजात रूपांतरित झाला आहे!

एकेकाळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण असे तारांकित फलंदाज होते. ते फिरकीवर सहज वर्चस्व गाजवायचे. सध्याच्या भारतीय संघातील फलंदाज हे फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर अन्य संघांप्रमाणेच संघर्ष करतात हे न्यूझिलंडने दाखवून दिले आहे. भारतीय संघाला फलंदाजांचा क्रम बदलणे धोक्याचे ठरले. पुण्यातील कसोटीत दुस-या डावात मैदानावर डावी-उजवी जोडी कायम ठेवण्यासाठी पंत बाद झाल्यानंतर सर्फराजच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला बढती देण्यात आली. मात्र हा प्रयोग फसला. कसोटीत फलंदाजाचा क्रम बदलणे धोक्याचे ठरते. त्यामुळे सर्फराजचा आत्मविश्वास कमी झाला असेल. दुसरे म्हणजे टी-२० व एकदिवसीय प्रकारात फलंदाजांचा क्रम बदलणे श्रेयस्कर ठरते.

कसोटीत शक्यतो असे प्रयत्न करू नयेत असे म्हटले जाते. भारताने कसोटीत इंग्लंडप्रमाणे आक्रमक शैलीत खेळण्याचा प्रयत्न केला तो अंगलट आला असेच म्हणावे लागेल. आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्र्वरित सहापैकी (एक न्यूझिलंडविरुद्धची आणि ५ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या) किमान ४ लढती जिंकाव्या लागतील. भारतासह ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, श्रीलंका व न्यूझिलंड संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून आहेत. न्यूझिलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामागे भारताच्या अनुभवी खेळाडूंचे अपयश प्रामुख्याने कारणीभूत आहे. रोहित-विराटचा फॉर्म ही मोठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे या दोघांनी आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी कसोटी मालिका नसताना रणजी स्पर्धेत खेळायला हवे. एखाद्या कनिष्ठ खेळाडूला फॉर्म मिळवण्यासाठी घरगुती स्पर्धेत खेळणे सक्तीचे केले जाते. हा नियम आता वरिष्ठ खेळाडूंनाही लागू करण्याची वेळ आली आहे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR