बोरी : डीबी पथकाने पोलीस स्टेशन बोरी हद्दीत दि. २१ ऑस्ट रोजी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत सराईत गुन्हेगार चोरीच्या उद्देशाने इलेक्ट्रीक ऑटोने आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली असता ओमकारसिंग उर्फ रफ्तार रूपसिंग बावरी (वय २०), सेवकसिंग उर्फ कान्हासिंग रेड्डीसिंग बावरी (वय २०) यांना जेरबंद केले. या आरोपींची झडती घेतली असता ९७ हजारांची रोख व ३ लाख रुपये किंमतीचा नवीन इलेक्ट्रीक ऑटो असा एकुण ३ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची चौकशी केली असता घरफोडीचा १ चोरीचे ४ गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपींनी बोरी परिसरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
डीबी पथक बोरी पोलिस स्टेशन हद्दीत दि. २१ रोजी पेट्रोलींग करत असताना दशरथसिंग उर्फ कोंड्या बादलसिंग जुन्नी (फरार), ओमकारसिंग उर्फ रफ्तार रूपसिंग बावरी, सेवकसिंग उर्फ कान्हासिंग रेड्डीसिंग बावरी, सर्व रा. झरी, ता. जि. परभणी यांनी बोरी येथील दुकान फोडले असून ते सध्या कोक पाटी परिसरात चोरीच्या उद्देशाने इलेक्ट्रिक ऑटोने आले असल्याची माहिती पथकाला कळाली होती. सदर माहितीच्या आधारे डीबी पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी ओमकारसिंग व सेवकसिंग यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून चोरीचे ९७ हजार रोख व ३ लाख रुपये किंमतीचा नवीन इलेक्ट्रिक ऑटो असा एकूण ३ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी बोरी पोलिस स्टेशन बोरी हद्दीतील मौजे आसेगाव, गुळखंड व बोरी परिसरात यापूर्वी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार बोरी येथील अभिलेख तपासले असता ५ गुन्हे निष्पन्न झाले आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर पोलिस स्टेशनच्या सहकार्याने करण्यात आली. कारवाई केलेल्या पथकात सपोनि. रामेश्वर धोंडगे, पोउपनि. महादेव गायकवाड, पोउपनि. सोपान थोरवे, पोह. राजेश जठाळ, अमोल मुंढे, पोशि. संघसेन कांबळे, मपोशी. फरीन रंगरेज यांचा समावेश होता. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगार सापडल्याने नागरिकांमधून समाधा व्यक्त होत आहे.
















