छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी आपण लवकरच भ्रष्टाचारासंदर्भात मोठा बॉम्ब फोडणार आहोत, असे जाहीर केले होते. हा बॉम्ब रमाई घरकुल योजनेतील गैरव्यवहारा संदर्भातील असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेत तब्बल शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी बॉम्बची वात पेटवली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेऊन इम्तियाज जलील यांनी त्यांच्याकडे या घोटाळ्या संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे सुपुर्द केले. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी, दलाल आणि काही राजकीय नेत्यांचा यात हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिरिक्त आयुक्तांकडून लेखी निवेदनावर उत्तर मिळाल्यानंतर आपण माध्यमांसमोर हा घोटाळा पुराव्यानिशी समोर आणू, यात अडकलेल्या बड्या राजकीय नेत्यांची नावेही घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी माध्यमांना सांगितले.
गेल्या अनेक दिवसापासून इम्तियाज जलील चर्चेत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप आणि त्याचे पुरावे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सादर केले होते. दरम्यानच्या काळातच त्यांनी रमाई घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बोगस फाईल तयार करून अनुदान लाटल्याचा आरोप केला होता. अडीच लाखाचे अनुदान घेऊन लाभार्थ्याला केवळ एक ते दीड लाख देऊन बाकीची रक्कम दलाल, महापालिकेतील काही अधिकारी-कर्मचा-यांनी संगनमताने लाटल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला होता.
त्यानंतर काल महापालिकेत धडक देत त्यांनी रमाई घरकुल योजनेत १०० कोटींचा घोटाळा महापालिकेच्या अधिका-यांनी काही दलालांशी हातमिळवणी करत केल्याचा आरोप केला. रमाई घरकुल घोटाळ्यामध्ये जे स्वत:ला समाजाचे मोठे नेते म्हणवून घेतात त्या बड्या नेत्यांचा हात आहे. लाभार्थी शोधण्यासाठी ज्या संस्थेला २५ लाखांमध्ये कंत्राट देण्यात आले आहे त्यामध्ये दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
एकाच कुटुंबातील चार लाभार्थी तयार करून बोगस कागदपत्रांच्या आधारे या योजनेत घोटाळा झाल्याचे पुरावे आपण सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे सोपवल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. सदर तक्रारीवर अतिरिक्त आयुक्तांकडून उत्तर मिळाल्यानंतर लवकरच या संदर्भातील सगळे पुरावे आपण माध्यमांसमोर आणू आणि यात कोण बडे नेते आहेत? त्यांची नावेही जाहीर करू, असे इम्तियाज जलील म्हणाले.