अनेकांची प्रकृती गंभीर, गर्दी झाल्याने दुर्घटना
पुरी : वृत्तसंस्था
ओदिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान रथ ओढताना झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत ६०० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. यातील काही भाविकांची प्रकृती गंभीर आहे. भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलभद्र यांच्या रथांना श्री गुंडिचा मंदिराकडे ओढताना जय जगन्नाथ आणि हरि बोलच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या दरम्यान, भाविकांची प्रचंड गर्दी, उष्णता आणि दमट हवामानामुळे अनेक भाविक बेशुद्ध झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुरीच्या १२ व्या शतकातील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा २.६ किलोमीटर दूर असलेल्या श्री गुंडिचा मंदिरापर्यंत जाते. शुक्रवारी सकाळी पहांडी विधीनंतर रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ४.०८ वाजता सर्वात आधी भगवान बलभद्र यांचा ‘तालध्वज’ रथ, त्यानंतर देवी सुभद्रा यांचा ‘दर्पदलन’ रथ आणि शेवटी भगवान जगन्नाथ यांचा ‘नंदीघोष’ रथ मार्गस्थ झाला. यावेळी शंख, घंटे, झांज आणि तुरहीच्या ध्वनींनी परिसर दुमदुमला होता.
पुरीचे राजा गजपती महाराजा दिव्यसिंह देब यांनी तीनही रथांवर ‘छेरापहंरा’ ची विधी पूर्ण केली. त्यानंतर भाविकांनी रथ ओढायला सुरुवात केली. प्रत्येक रथावर वेगवेगळ््या रंगांचे लाकडी घोडे जोडलेले होते. रथयात्रेत ओदिशाचे राज्यपाल हरी बाबू कंभमपति, मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंह शेखावत, पुरीचे खासदार संबित पात्रा आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. गोवर्धन पिठाचे ८१ वर्षीय शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती व्हीलचेअरवरून रथांचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
१० लाख भाविक सहभागी
यावर्षी रथयात्रेत सुमारे १० लाख भाविक सहभागी झाले होते. जास्त गर्दीमुळे ६०० हून अधिक भाविक जखमी झाले. ओदिशाचे आरोग्य मंत्री मुकेश महालिंग यांनी सांगितले की, उष्णता आणि दमट हवामानामुळे काही भाविक बेशुद्ध झाले. बचाव पथकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत आणि ग्लूकोज व पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.