लातूर : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा उपसंचालक, लातूर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सव २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात हा महोत्सव होईल. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देणे व त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
युवकांमार्फत तयार करण्यात आलेले हस्तकला, वस्त्र उद्योग, अग्रो प्रोडक्ट इत्यादी वस्तूंचे प्रदर्शनही यावेळी आयोजित केले जाणार आहे. युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकारामध्ये समूह लोकनृत्य (सहभाग संख्या १०), वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या ५), लोकगीत (सहभाग संख्या १०), वैयक्तिक सोलो लोकगीते (सहभाग संख्या ५) स्पर्धा होईल. कौशल्य विकास प्रकारात कथा लेखन (सहभाग संख्या ३), पोष्टर स्पर्धा (सहभाग संख्या २), वकृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या २), फोटो ग्राफी (सहभाग संख्या २) या प्रकाराचा समावेश आहे. तसेच संकल्पना आधारित स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर (सहभाग संख्या ३५), सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (सहभाग संख्या ५) आणि युवाकृतीमध्ये हस्तकला (सहभाग संख्या ७), स्त्री उद्योग (सहभाग संख्या ७), अग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या ७) इत्यादी कलाकृतीचे आयोजन करण्यात येणार आहे.लातूर जिल्ह्यातील उपरोक्त कला प्रकारामध्ये इच्छुक असणा-या युवक व युवतींनी आपली नावे २६ नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्षात व ई-मेल आयडी dsolatur@rediffmail.com वर नोंदवावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. ९९७५५७६६००) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व जिल्हा कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.