चार वर्षांपूर्वी जपानच्या टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक सोहळ्यावर जगावर आपत्ती म्हणून कोसळलेल्या कोरोना महामारीचे सावट होते. त्या सावटात रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद व प्रोत्साहनाविनाच जगभरातल्या खेळाडूंनी आपली कौशल्ये पणाला लावित पदके पटकावली खरी मात्र, स्पर्धेचे वर्णन ‘घोस्ट गेम्स’ असेच झाले! शतकानंतर फ्रान्सच्या पॅरिस नगरीत शुक्रवारी मध्यरात्री शानदार उद्घाटन सोहळ्यासह सुरू झालेल्या ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यावर मागच्या स्पर्धेच्या कटू स्मृती पुसून टाकत नवा उत्साह निर्माण करण्याची जबाबदारी होती व नवसंकल्पनांचा समृद्ध वारसा जपत जगाला सतत नवसंकल्पना देण्याची परंपरा जपणा-या पॅरिस नगरीने आपल्या या लौकिकात भर घालत ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली.
१९२४ मध्ये याच पॅरिस नगरीने ऑलिम्पिक सोहळ्यासाठी ‘ऑलिम्पिक ग्राम’ची नवसंकल्पना राबविली होती व नंतर जगभरात तो पायंडाच पडला! यावेळी या पॅरिस नगरीने ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये न घेता खुल्या आभाळाखाली घेण्याची नवसंकल्पना आणली आणि थेट सीन नदीच्या पात्रात ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा रंगला! सुमारे १०० बोटींमधून २०६ देशांच्या खेळाडूंनी सीन नदीच्या किना-यावर दुतर्फा बसलेल्या लाखो प्रेक्षकांना अभिवादन करीत पथसंचलन केले. त्यात ११७ खेळाडूंच्या भारतीय पथकाचा समावेश होता. एकीकडे ही नवसंकल्पना राबविली जात असताना दुसरीकडे या सोहळ्याला गालबोट लावण्याचा अश्लाघ्य प्रयत्नही झाला. पॅरिसमधील रेल्वेसेवेवर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे फ्रान्सच्या अन्य शहरांबरोबरच युरोपातून पॅरिसकडे होणारी रेल्वेवाहतूक ठप्प झाली. काही खेळाडूंसह लाखो प्रवासी व ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आलेल्या जगभरातील प्रेक्षकांना त्याचा फटका बसला.
पूर्व, पश्चिम, उत्तरेकडून पॅरिसकडे जाणा-या मुख्य रेल्वेमार्गावर हल्लेखोरांनी जाळपोळ करत विध्वंस घडवला. ऑलिम्पिकसाठी पॅरिसकडे निघालेल्या खेळाडूंच्या चारपैकी दोन रेल्वेगाड्या अटालांटिकजवळ थांबविण्यात आल्या. मात्र, प्रशासनाने त्वरित परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ऑलिम्पिकसाठी आलेल्या पाहुण्यांच्या प्रवासात कुठलाही अडथळा येणार नाही याची व्यवस्था केली आणि उद्घाटन सोहळा निर्विघ्न पार पडला. भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल यांनी केले. भारतीय खेळाडूंच्या पांढ-या पेहरावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी भारतीय पथकात ११७ खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्यासोबत १४० कर्मचारी व अधिकारीही आहेत. ११७ खेळाडंूमध्ये अॅथलेटिक्सचे २९, २१ नेमबाज, १९ हॉकी अशी निम्म्याहून अधिक संख्या आहे. मागच्या स्पर्धेत सात पदके आणणारे भारतीय खेळाडू यावेळी दोन अंकी पदके खेचून आणतील अशी आशा भारतीय क्रीडा रसिकांना आहे.
यावेळी भारतीय खेळाडूंच्या पूर्वतयारीवर केंद्र सरकारने ४७० कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येते आहे. बहुतेक खेळाडू गेले काही महिने युरोपातच सराव करून तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पदकांची अपेक्षा असणे यात गैर काही नाही हे खरे पण अशा अपेक्षा ठेवताना खेळाडू घडवण्यासाठीचे आपले प्रयत्न किती गंभीर व सातत्यपूर्ण आहेत हे ही तपासावे लागते. अशी तपासणी केल्यावर १४० कोटी लोकसंख्या असणा-या आपल्या देशाला अजूनही एक अंकी पदकांवर समाधान का मानावे लागते याचे उत्तर मिळते. मुळात खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची आपली मानसिकताच नाही. त्यामुळे आपल्या देशात क्रीडासंस्कृतीच रुजलेली नाही. त्यात ही मानसिकता बदलण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायचे त्या राज्यकर्त्यांना क्रीडासंस्कृतीबाबत अनास्थाच! त्यामुळे क्रीडाक्षेत्रासाठी सढळ सोडाच पण पुरेसा वा आवश्यक निधी देण्याबाबत कायम अनास्थाच! त्यात जेवढा केवढा निधी मिळतो त्याभोवती राजकारण व भ्रष्टाचा-यांच्या भुंग्यांची भाऊगर्दी होते.
त्यातून खेळाडूंना ना धड प्रशिक्षण मिळते, ना सुविधा, ना प्रोत्साहन, ना नवकौशल्य मिळते. अशा सगळ्या निरस वातावरणात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होणार कसे आणि पदकांचे कमळ फुलणार कसे? हा यक्ष प्रश्नच! प्रत्येक स्पर्धेनंतर या परिस्थितीवर काही काळ चर्चा होते खरी मात्र परिस्थितीत फारसा बदल होताना दिसत नाहीच! त्यात आपल्या पदरात जी काही पदके पडतात त्याचे संपूर्ण श्रेय त्या खेळाडूंच्या वैयक्तिक प्रयत्न व कौशल्यालाच द्यावे लागेल. उदाहरणच द्यायचे तर ज्या कुस्ती प्रकारात भारताला हमखास पदकांची आशा असते त्या कुस्ती क्षेत्रात मागची दोन-तीन वर्षे जो खेळखंडोबा सुरू आहे तो पाहता कुस्तीपटूंना ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला असेल का? ही शंकाच! अर्थात मागच्या काही वर्षांमध्ये देशात थोडीफार क्रीडासंस्कृती रुजायला नक्कीच सुरुवात झाली आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळही आहेत याची जाणीव सरकार व प्रायोजकांना नक्कीच झाली आहे.
प्रायोजकांनी खेळाडूंमागे आपली आर्थिक शक्ती लावल्याने गेल्या काही स्पर्धांमध्ये भारताचे पदकतालिकेतील स्थान हळूहळू वर सरकताना दिसते आहे. भारताला नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती, तिरंदाजी, भालाफेक आदी प्रकारांमध्ये सुवर्ण पदकाच्या आशा आहेत. त्या कितपत पूर्ण होतात हे पाहूया! ११ ऑगस्टपर्यंत पॅरिस नगरीत चालणारा हा ऑलिम्पिकचा कुंभमेळा जगाच्या सर्वोच्च आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. अर्थात जगात त्या जोडीला युद्धे, शीतयुद्धे, छुपी युद्धे सुरूच आहेत. जसे याच्या झळा या क्रीडा कुंभमेळ्यास बसणे अटळ तसेच विविध देशांमधील निवडणुकांचेही पडसाद या कुंभमेळ्यावर कमी-अधिक प्रमाणात उमटणे अटळच! मात्र, तरीही ऑलिम्पिकची मशाल दिमाखाने पेटती ठेवून जगाला एक सकारात्मक संदेश हा क्रीडा कुंभमेळा सदोदित देतच राहील. त्याचीच ग्वाही शुक्रवारच्या शानदार उद्घाटन सोहळ्याने जगाला दिली आहे हे निश्चित!