34.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeनांदेडट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ महिला मजूर ठार

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ महिला मजूर ठार

३ जण जखमी, आलेगाव येथील घटना मृतांसह जखमी हिंगोली जिल्ह्यातील

नांदेड : प्रतिनिधी
तालुक्यातील आलेगाव येथे मजुराला घेऊन शेताकडे जात असलेले ट्रॅक्टर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने एका विहिरीमध्ये कोसळले. यात ७ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सर्व मयत व जखमी गुंजगाव ता. वसमत जि. हिगोली येथील मजूरदार आहेत.

नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे हळद काढणीसाठी गुंजगाव ता. वसमत जि. हिंगोली येथील १० मजूर एका ट्रॅक्टरमध्ये बसून आले होते. आलेगाव येथील शेतामध्ये जात असताना रस्त्यात असलेल्या एका विहिरीमध्ये वाहन चालकाचा ताबा सुटल्याने सदर ट्रॅक्टर कोसळले. यात ७ महिलांचा मृत्यू झाला असून त्यात २ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. जखमीमध्ये २ महिला सह १ पुरुष जखमी झाला असून दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार जिल्हाधिकारी कर्डिले यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळी १० वाजल्यापासून मृतदेह शोधण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन घटना स्थळी दाखल झाले होते. दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास ७ जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आले. मृतामध्ये ताराबाई सटवाजी जाधव वय ३५, धुरपता सटवाजी जाधव वय १८, सरस्वती लखन मुरड वय २५, चतुराबाई माधव पारदे वय ४५, सपना उर्फ मीना राजू राऊत वय २५, ज्योती इरबाजी सरोदे वय ३० या ७ महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर जखमी पार्वतीबाई रामा बुरडे ३५, पुरभाबाई संतोष कांबळे वय ४०, सटवाजी जाधव वय ५५ सर्व रा. गुंजगाव ता. वसमत जि. हिंगोली येथील रहिवासी आहेत.

त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शहरासह जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापनाचे समूह घटनास्थळी दाखल झाले होते. सकाळी १० वाजल्यापासून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी बराच वेळ कसरत करावी लागली. परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाला होता.

चालक फरार
लिंबगाव पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधनकर हे सकाळी १० वाजल्यापासून घटनास्थळी आपल्या सहकार्यासह दाखल झाले होते. ट्रॅक्टर चालक घटना घडल्यानंतर फरार झाला असून याबाबत लिबगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालकाला तात्काळ अटक करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधनकर यांनी सांगितले. सदर अपघात हा ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून सदर विहिरीला कठडे नसल्यामुळे वाहन चालकाच्या नजरेस विहीर आली नसावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर
ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

घटना दुर्दैवी : मुख्यमंत्री
अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR