मुंबई : प्रतिनिधी
चंद्रशखेर बावनकुळे यांनी विजयी मेळाव्याला काँग्रेसला बोलावलं नाही किंवा बिहार विधानसभा निवडणुकीत फटका मिळेल म्हणून विजयी मेळाव्याला काँग्रेस पार्टीचे लोक गेले नाहीत, किंवा काँग्रेस पार्टीच्या अजेंड्यात ते बसत नाही अशी टीकी केली होती. याला प्रत्युत्तर देताना ‘बावनकुळे यांनी आता स्वत:ची चिंता करावी, कारण दोन बंधू एकत्र आल्यानंतर आता त्यांना चिंता पडली आहे. त्यामुळे त्यांनी दोन वेळा पंढरीची वारी करावी. शिवाय आम्ही का गेलो नाही, हे आम्ही आमचं ठरवू त्यांनी यात पडू नये’ अशी टीकात्मक प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून मराठीच्या मुद्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत शनिवारी मुंबईत विजयी मेळावा घेतला. राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले. ठाकरे बंधूंच्या या ग्रँड सोहळ्यानंतर आता राजकीय वर्तुळातून तसेच खासकरून महायुतीमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आमदार संजय गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झाला. माझ्यासारखा नेता सुद्धा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये तयार झाला. मी आता काँग्रेसमध्ये असलो तरी बाळासाहेबांच्या नेतृत्वात तयार झालो आहे. बाळासाहेबांनी कधी जात-पात, धर्म-पंथ मानला नाही. आता दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना इतका पोटशूळ आणि वेदना का होत आहेत ते समजत नाही? महापुरुषांचा अपमान करणा-यांची अवलाद आता निर्माण व्हायला लागली आहे आणि हीच जनता महापुरुषांचा अवमान करणा-या अवलादीचा सुपडा साफ करेल, आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार यांनी अशी टीका केली.
आमच्यामध्ये मतभेद ठेवू नकोस, विठ्ठल चरणी प्रार्थना
विठ्ठल हा जो त्याच्या चरणाशी जाईल त्याचा आहे, वारी ही संतांची परंपरा आहे. संत हे नेहमी मानवतेचे काम करणारे आहेत. तुकोबा, ज्ञानोबा गोरा कुंभार, संत एकनाथ, चोखामेळा, नामदेव ही एक मोठी परंपरा महाराष्ट्रातील संतांची आहे. वारी ही संतांनी सुरू केलेली आहे आणि ही एकतेची वारी आहे. महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा आणि एकोप्याने समाजाचा उद्धार व्हावा, यासाठी वारी आहे. जात-पात, धर्म-पंथ विसरून दुरावा संपुष्टात आणून विठोबाच्या चरणी लीन होऊन पंढरीच्या पांडुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत. आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस अशी प्रार्थना विठ्ठल चरणी केली आहे.