मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महायुतीला दुहेरी धक्का दिला. माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपकआबा साळुंखे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते उद्या हातात मशाल घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवारांची साथ सोडलेली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचा उद्या दुपारी तीन वाजता मातोश्री येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे. सांगोला हा पारंपरिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटाने या जागेवर हक्क सांगत दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष बंड करण्याच्या तयारीत असणार आहे. जर महाविकास आघाडीने अन्याय केला तर आम्ही सांगोल्यात लाल बावटा फडकाऊ, असा इशारा शेकापच्या अनिकेत देशमुख यांनी दिला होता.