26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रड्रग तस्करी प्रकरणी मोक्का लावणार

ड्रग तस्करी प्रकरणी मोक्का लावणार

फडणवीसांनी सभागृहात केली घोषणा

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात ड्रग्सच्या तस्करीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच ड्रग्स तस्करीचा मुद्दा आज (०२ जुलै) विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. भाजपाचे आमदार परिणय फुके आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी ड्रग्स तस्करी प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे.

प्रश्नोत्तराच्या तासाला परिणय फुके म्हणाले की, राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याप्रकरणी कारवाई करण्याची गरज आहे. राज्याला ड्रग्सचा विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तसेच तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? कारण ड्रग्स तस्करी करणा-यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? कारण राज्यात ठिकठिकाणी ड्रग आणि अमली पदार्थांची तस्करी होते आहे. यावर शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ड्रग्सची तस्करी रोखण्यसााठी टास्क फोर्स केली होती त्याच काय झालं? असा प्रश्नांचा भडीमार परिणय फुके यांनी केला.

परिणय फुके यांच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ड्रग तस्करी संदर्भात मकोका लावत येईल का? यावर आपण या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. तसेच ड्रग तस्करी करणा-यांवर मोक्का लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर एकनाथ खडसे उभे राहिले आणि त्यांनी मुद्दा उपस्थित केला की, इतर राज्यातून आपल्या राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होत आहे. मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवरून अफू आणि गांजाची तस्करी जळगाव व मुक्ताई नगर येथे होत आहे, याकडे एकनाथ खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बॉर्डरवर काही राज्यात भांगाला परवानगी आहे. परंतु आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR