मुंबई : प्रतिनिधी
ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा हा खेळ सर्वांसमोर आला आहे. पुण्यातील तरुणाई अमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
दरम्यान, आता या प्रकरणावरून जोरदार राजकारण पेटले आहे. आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरून सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.
आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारवर टीका केली. माध्यमांसोबत बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, अमली पदार्थ विकले जातात यात आता पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो. आज करोडो रुपयांचे अमली पदार्थ सापडत आहेत. याचे व्हीडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर सरकारला जाग येते. एवढे दिवस सरकारने बुलडोझर का फिरवला नाही? अधिवेशनात चर्चा होईल म्हणून तात्पुरती एखाद्या हॉटेलवर कारवाई केली, असा आरोपही धंगेकर यांनी केला.
पुण्याच्या उंब-यावर अमली पदार्थ
आमदार धंगेकर म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अमली पदार्थ पुण्याच्या उंब-यावर आला आहे. पुण्याने मोठमोठे राजकीय नेते दिले आहेत. लाखो विद्यार्थी पुण्यात येतात. पण, पुण्यात पब संस्कृतीमुळे पुणे बदनाम होत आहे. याचा विचार पोलिसांनी केला पाहिजे. रात्री साडेतीन वाजता हे सापडत असेल तर पोलिसांना हे कळले कसे नाही, पोलिसांच्या मेहरबानीमुळे हे चालत आहे, असेही आमदार रवींद्र्र धंगेकर म्हणाले.