मुंबई : महायुतीत पालकमंत्रिपदावरून मोठा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी पालकमंत्रिपदावरून महायुतीत असलेल्या वादावर भाष्य केले आहे. आमच्या तीनही पक्षांत मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नाही. तसेच पालकमंत्रिपदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही, असे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट सांगितले.
सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना
आम्ही निवडून आल्या आल्या सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेब यांना दिले आहेत. आमच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेब यांना आहे. एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल आणि पालकमंत्र्यांसंदर्भात निर्णय होईल, असे शंभुराज देसाई म्हणाले.
आमच्या तीनही पक्षांत मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती, तसेच पालकमंत्रिपदावरून आमची कोणतीही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे. पण याचा सर्वस्वी निर्णय आमचे नेते घेतील. आमचा पक्ष शिस्त पाळणारा आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व मंत्री त्यांना जो विभाग मिळाला त्यामध्ये चांगलं काम करून दाखवतील. आम्ही हातात हात घालून चांगले काम करू, असे शंभुराज देसाईंनी म्हटले.
दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचे खातेवाटप
पालकमंत्रिपदाच्या अधिकृत नावाचा अंतिम निर्णय हे तिघेजण मिळून घेणार आहेत. खातेवाटप होईपर्यंत चार दिवस याला हे खाते मिळणार, त्याला ते खाते मिळणार अशा बातम्या सुरू होत्या. पण खाते देत असताना समतोल राखण्यात आला आहे. त्यामुळे जरा धीर धरा, येत्या दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचे खातेवाटप होईल. आमच्या तीन पक्षांत मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. तसेच पालकमंत्रिपदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही, असेही शंभुराज देसाई म्हणाले.