मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पहिल्यांदा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. जे पर्यटन स्थळी गेले होते त्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम केले. माणुसकीला काळिमा फासण्याचे काम केले.
दहशतवाद्यांना आणि पाकला जशास तसे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशनच्या माध्यमातून दिले आहे. कुंकू पुसण्याचे पाप केले त्यांना धडा शिकवला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता.
अखेर भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ करून पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-काश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला १४ दिवसांनंतर घेतला आहे. सियालकोट हा भारत आणि पाकिस्तान सीमेवरील दहशतीचा अड्डा आहे. या भागाला दहशतवादी हालचालींचे केंद्र असे म्हटले जाते. हे उद्ध्वस्त केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मध्यरात्री दीड वाजता भारतीय हवाई दलाच्या राफेल आणि जेट्स विमानांनी नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.