23 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeधाराशिवदारू विकणारे शिंदेवाडीचे काळे कुटूंब आता विकतेय फुले 

दारू विकणारे शिंदेवाडीचे काळे कुटूंब आता विकतेय फुले 

धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे थाटले दुकान

सुभाष कदम
धाराशिव : काही वर्षापुर्वी हातभट्टी (गावठी) दारूची विक्री करणारे धाराशिव तालुक्यातील शिंदेवाडी येथील संभाजी (पप्पू) प्रभाकर काळे यांचे कुटूंब आता त्याच जागेवर फुले, फुलांचा हार, देवाच्या मुर्ती विकण्याचा व्यवसाय करू लागले आहे. या काळे कुटुंबामध्ये मोठे परिवर्तन झाले असून, त्यांचा या व्यवसायातुन सुखाने व समाधानाने संसार सुरू आहे. शिक्षणाचा गंध नसलेल्या या कुटुंबातील तीन्ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून वाघोली येथील शाळेत शिक्षण घेत आहेत.

धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील माळरानावर (दगड खाणीजवळ) शिंदेवाडी येथील पारधी समाजातील संभाजी (पप्पू) प्रभाकर काळे यांचे संपूर्ण कुटूंब हातभट्टी (गावठी) दारू विक्रीचा व्यवसाय करीत होते. या ठिकाणी टी पॉईंट आहे. एक रस्ता धाराशिवला, दुसरा वाघोली गावात, तर तिसरा काजळा गावाकडे जातो. त्या ठिकाणी एसटी बसला थांबा असल्याने येथे नेहमीत प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे संभाजी काळे यांच्या कुटुंबाने येथे दारू विक्रीचा व्यवसाय थाटला होता.

ज्या ठिकाणी संभाजी काळे दारू विक्री करायचा, त्याच ठिकाणी पोलीस दलातील अधिकारी बालाजी मगर व वाघोली येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून जवळपास कोटभर रूपये खर्च करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे भव्यदिव्य व देखणे मंदिर उभारले आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी या मंदिरात मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरात दररोज व दर गुरूवारी, पोर्णिमा आदी दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत आहेत.

वाघोलीच्या माळरानावर श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर झाल्याने पारधी समाजातील संभाजी काळे याच्या दारू विक्रीच्या व्यवसायावर आपोआप परिणाम झाला. आता दुसरीकडे दारू विक्रीचे दुकान थाटावे, अशी काळे कुटुंबात चर्चा सुरू झाली. परंतु, चमत्कार म्हणा की परिवर्तन म्हणा, संभाजी काळे यांच्या कुटुंबियांनी आता यापुढे दारू गाळायची नाही, अन् विकायची पण नाही, असा निश्चय केला. काळे कुटुंबाच्या या निर्णयाचे वाघोली व शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी स्वागत केले. त्याच्या या धाडसी निर्णयामुळे वाघोली येथील ग्रामस्थांनी संभाजी काळे याला श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराच्या पायथ्याशी फुले, फुलांचे हार, देवांच्या मुर्ती आदी वस्तु विक्री करण्यासाठी दुकानाला जागा दिली. मंदिराची उभारणी झाल्यापासून संभाजी काळे यांच्या कुटुंबाने दारू निर्मिती व दारू विक्री चक्क बंद केली आहे. मंदिराच्या पायथ्याशी आता प्रासादिक भांडार सुरू केले असून, यातून मिळणा-या उत्पन्नातून त्यांचा संसार स्वामी कृपेने सुखासमाधाने सुरू आहे.

देवानेच बुद्धी घातली
आमचा दारू विक्रीचा पिढीजात धंदा आहे. आमच्या समाजात शिक्षणाला महत्व दिले जात नाही. त्यामुळे आम्ही वाघोलीच्या माळावर गेल्या अनेक वर्षापासून दारू विकत होतो. आता या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजाचे भव्य मंदिर झाल्याने आमच्या कुटुंबात परिवर्तन झाले आहे. देवाने बुद्धी घातल्याने आम्ही दारू विक्री बंद करून प्रासादिक भांडार सुरू केले आहे. या व्यवसायातून आम्ही समाधानी आहोत. आमची मुले शाळा शिकत असून भविष्यात स्वामी कृपेने सरकारी नोकरीत लागणार आहेत.
संभाजी प्रभाकर काळे, शिंदेवाडी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR