पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत बाष्पाचे प्रमाण कमी होऊन हवामान कोरडे झाल्यामुळे रात्री आणि पहाटे गारवा जाणवू लागला आहे. तर दुसरीकडे दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला आदळल्यानंतर हवेतील बाष्प पश्चिमेकडे येत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत गुलाबी थंडी पडू लागली आहे. वातावरणाची हीच स्थिती पावसासाठी पूरक आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मोसमी वा-यांनी माघार घेतल्यानंतरच राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात पाऊस पडतो. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे अनेक राज्यांत ठीकठिकाणी पाऊस पडला. गेल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर तापमानात वाढ होऊन काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हिट’ जाणवेल.
मात्र, २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात परतीचा पाऊस चांगलाच लांबला आहे. नैऋत्य मोसमी वा-यांनी माघार घेतली असली तरी राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या व दुस-या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. असे असले तरी ऑक्टोबर हीटचा चटका देखील अनुभवावयास मिळाला. त्यात आता पुन्हा पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
गुलाबी थंडीचा जोर
एकीकडे गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्यात २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खालील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
२९ आणि ३० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. तर ३१ ऑक्टोबरला यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांत वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतरत्र हवामान सामान्यत: कोरडे राहण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळानंतरचा परिणाम
गेल्या काही दिवसांपासून हवेत बाष्प नसल्यामुळे वातावरण कोरडे झाले होते. त्यामुळे गारव्याची चाहूल सुरू झाली. केवळ चक्रीवादळानंतर हवेतून येणारे बाष्प पश्चिमेकडे येते. त्यामुळे दिवाळीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
हवेची गुणवत्ता खालावणार?
हवेतील धुलिकणांवर हवेची गुणवत्ता अवलंबून असते. गेल्या काही दिवसांत हवामान कोरडे झाल्यामुळे धुलिकणांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात आता दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे.