मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचा प्रभाव तीव्रतेने जाणवत आहे. मागच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेती संकटात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी पेरणी करू शकत नाही. दुसरीकडे जी पेरणी केली होती, ते पीक वाया जात आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून राज्यात कोरडा दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
राज्यातला शेतकरी दुष्काळाच्या या झळा सोसत असताना आज नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे गेले होते. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी बैठकीत चक्क मंत्री आणि आमदारांसाठी काजू, बदाम देण्यात आले. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचा जोरदार पाहुणचार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना चक्क काजू, बादामाचा खुराक देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आठ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करताना मंत्री आणि आमदार चक्क काजू बादाम खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात खासदार संजय जाधव बादामावर ताव मारताना दिसत आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर काजू आणि बादामच्या प्लेट तातडीने हटवण्यात आल्या.
अधिका-यांना डोकं आहे का?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. अधिका-यांना डोके नाहीये का? असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला या बैठकीला जाता आलं नाही. मात्र आमचे अधिकारी तिथे गेले आहेत. दत्ता भरणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. अधिका-यांवर काही गोष्टींची जबाबदारी असते. कोणत्या विषयावर बैठक सुरू आहे आणि आपण काय करतो हे अधिका-यांना समजले पाहिजे असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला.
काजू-बदामावर मुख्यमंत्र्यांची नाराजी
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या ढिसाळपणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शासकीय बैठकांमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवण्याची प्रशासनाची एक पारंपरिक पद्धत असते, पण अशा गंभीर विषयांच्या बैठकीत या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत. कोणी मुद्दाम दुष्काळात असे केले असे म्हणणे चुकीचे ठरेल, तरीही अधिका-यांनी आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संवेदनशीलता बाळगलीच पाहिजे.
शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले : अंबादास दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकारावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात शेतकरी पाण्याअभावी, विजेअभावी आणि पिके जळाल्यामुळे हवालदिल झाला आहे. कर्जाच्या विळख्यात शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असताना, दुष्काळाच्या बैठकीत बसून काजू-बदाम चघळणे म्हणजे शेतक-यांच्या दु:खाची क्रूर थट्टा आहे. शेजारच्या कर्नाटक सरकारने तत्काळ निर्णय घेत दुष्काळ जाहीर केला; परंतु महाराष्ट्रातील निष्क्रिय सरकार केवळ बैठकांचे सोपस्कार करत मुहूर्त शोधत बसले आहे. सरकारने तोंडदेखलेपणा बंद करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा असे अंबादास दानवे म्हणाले.
शेतक-यां दु:खी, खिन्न अवस्था : सुषमा अंधारे
मराठवड्यातला शेतकरी कोणत्या परिस्थितीतून जातोय. दुष्काळ जाहीर करण्यासाठी कसल्या बैठक घेता? रेस्ट हाऊसवर बसून कसल्या बैठका करता, धरणं कोरडी पडली आहेत.रात्रीचा काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला आहे. मुख्यमंर्त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका का घेऊ नये? चमकोगिरी हे मंत्री करतायत. शेतकरी दु:खी, खिन्न अवस्थेत असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे शिंदेंचे मंत्री करत आहेत’ अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली.
















