24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरदेशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना होणार

देशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना होणार

लातूर : प्रतिनिधी
देशातील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी कार्डची अंमलबजावणी कर्नाटक, तेलंगणात या काँग्रेसशासीत राज्यात चालू आहे. भाजपने गेल्या दहा वर्षात शेतक-यांचे कर्ज माफ केले नाहीत, परंतु उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केले. शेतक-यांच दुप्पट उत्पन्न करतो म्हणाले, शेती मालाला हमीभाव देतो म्हणाले, पण त्यांनी असे काही केले नाही. शेतीमालाला हमीभाव भाजपने न दिल्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, देशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका येथील विष्णुदास मंगल कार्यालयात लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ओबीसी पदाधिकारी मेळावा संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी आमदार रामहरी रुपनवर, लातुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, प्रा. यशपाल भिगे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, माजी महापौर प्रा.डॉ. स्मिता खानापुरे, माजी महापौर दीपक सुळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस चंद्रकांत धायगुडे,सरचिटणीस विजयकुमार साबदे,लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील, जालिंदर बर्डे, एन. आर. पाटील, सपना किसवे, पूजा इगे, गोटू यादव, व्यंकटेश पुरी, संभाजी सूळ, रघुनाथ मदने, अनिलकुमार माळी, उमाकांत खलंगरे, शेषेराव हाके आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शिवाजी काळगे हे  लातूर पॅटर्नचे प्रतीक  
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, देशामध्ये बदल घडविण्यासाठी आपण संघटित झालेलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना ऊर्जा देणारा हा मेळावा आहे. डॉ. शिवाजी काळगे हे लातूर पॅटर्नचे प्रतीक आहेत. लातूर पॅटर्न म्हणजे गुणवत्तेचा  परिश्रमाचा त्यागाचा हा लातूर पॅटर्न होय. लातूर ही डॉक्टर तयार करण्याची फॅक्टरी आहे, नीट परीक्षेच्या निकालात लातूरचे १६०० विद्यार्थी उत्तीर्ण होतात असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यात ओबीसी समाजाचे महानगरपालिकेत सर्वाधिक महापौर झाले, लातूर जिल्हा परिषदेतही अध्यक्ष सर्वाधिक ओबीसी समाजाचे झाले, स्थानिक स्वराज्य संस्थेतही अधिक प्रतिनिधित्व या समाजाला देऊ. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी नेहमी काँग्रेसचा विचार तेवत ठेवण्याचे काम लातूरात केले. लोकसभा निवडणुकीच्या माध्यममातून आज काँग्रेस पक्षाने जनतेला न्याय पत्र दिले आहे, असे ते म्हणाले ते म्हणाले. गेली ५० वर्षे लातूरात काँग्रेसचा झेंडा दिमाखाने कार्यकर्त्यांच्या जीवावर फडकत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५ लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज शेतक-यांना देते, सहकारामुळे लातूरची अर्थव्यवस्था टिकून आहे, शेतक-यांच्या मुलीला लग्नासाठी शुभ मंगल योजना आहे, विद्यार्थ्यांसाठीही बँकेच्या योजना आहेत, काँग्रेसचे गॅरंटी कार्ड काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन करून त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
लोकनेते विलासराव देशमुख  मुख्यमंत्री असताना
ओबीसी समाजासाठी अनेक  महत्वाचे निर्णय घेतले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी म्हणाले की, आमच्या जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विकास कामाच्या पाट्या सर्वाधिक आहेत. लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले, विदयार्थ्यांना स्कॉलरशिप त्यांनी मंजूर केली. आज भाजपच्या राज्यात देशात व राज्यातील माणूस महागाईने होरपळत आहे. भाजपने ओबीसीचा गळा घोटण्याचे काम केले आहे, पंडीत नेहरू, महात्मा गाधींच्या काळातील जुने दिवस आणण्यासाठी ओबीसी पदाधिकारीनी कामाला लागावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता आणि त्यांनी तयार केलेली घटना भाजपा पायदळी तुडवते. देशाच्या स्वायत्त संस्थेवर भाजपचा दबाव आहे. काँग्रेस इंडिया आघाडीने शेतकरी कर्जमाफी पूर्णपणे करणार असल्याचे सांगितले आहे. पण आदानी आणि अंबानिचे कोठ्यावधीचे कर्जमाफ भाजपने केले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भाजपने काही योगदान दिले नाही. सत्तेत गेलेल्या भाजपमध्ये वाईट दिवस आले आहेत, मूळ भाजपचे लोकच राहीले नाहीत. विरोधी पक्षातील भ्रष्ट नेते सगळे तेथे आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे प्रामाणिक उच्चशिक्षित सुसंस्कृत आहेत म्हणून त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
मोदींची गॅरंटी फसवी आहे, सत्यमेव जयते हे काँग्रेसचे ब्रीद
माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की, गेल्यावेळी लातूरचा काँग्रेसचा खासदार निवडून न आल्यामुळे लातूरचे नुकसान झाले आहे, भाजपने शेतीमालाला भाव दिला नाही, दोन कोटी नोक-या, १५ लाख रुपये दिले नाहीत, महागाई कमी केली नाही, त्यामुळे मोदींची गॅरंटी फसवी आहे, सत्यमेव जयते हे काँग्रेसचे ब्रीद आहे, तर असत्यमेव जयते हे भाजपचे ब्रीद आहे. आपण अहिंसा मानतो भाजपवाले हिंसा माणतात केंद्र सरकारकडे इंपेरिकल डाटा आहे तो केंद्र सरकार देत नाही. म्हणून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. लातूरमध्ये काँग्रेस भक्कम आहे तुमचे गाव तुमची जबाबदारी असे समजून काँग्रेस पदाधिकारीनी काम करावे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, एलआयसी रेल्वे आधी जनतेच्या मालमत्ता पंतप्रधान मोदींनी आदानी अंबानीला विकल्या आहेत, इलेक्ट्रिल बॉण्डच्या घोटाळा त्यांनी केला, असे सांगून त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
दहा वर्षात भाजप सरकारने  शेतकरी शेतमजूर छोटे उद्योग धंद्यांना खीळ बसवली
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, मागच्या काळात सत्ताधा-यांनी सर्वसामान्यांचा गळा घोटण्याचे काम केले, त्या विरोधात आपण एकजुटीने काम करु मागच्या दहा वर्षात भाजप सरकारने शेतकरी शेतमजूर छोटे उद्योग धंद्यांना खीळ बसवली, शेतक-याला हमीभाव कर्जमाफी पीक विमा दिला नाही, परंतु काँग्रेस पक्षाने शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी पीक विमा शेतक-यांना वेळेवर देणे पीक विमा आयोग नेमणे, महिलांना शासकीय नोकरीत ५० टक्के आरक्षण देणे आदी अनेक बाबींचा जाहीरनामात हमी दिली आहे. भाजपने दोन कोटी नोक-या दिल्या नाहीत, ज्या नोक-या दिल्या त्या कंत्राटी स्वरूपात दिल्या अनेक परीक्षा रद्द करून या सरकारने बेरोजगारांची थट्टा केली, सर्वसामान्यांच सरकार आणण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी सर्वांनी, उभे राहावे असे सांगून त्यांनी महाविकास आघाडीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.
भाजपा हा भाड्याने जमवलेला  पक्ष आहे, 
ओबीसी समाज  हा काँग्रेसच्या पाठीशी  
प्रा. यशपाल भिंगे म्हणाले की, भाजपा हा भाड्याने जमवलेला पक्ष आहे, ओबीसी समाज हा काँग्रेसच्या पाठीशी आहे, भाजप सरकार बद्दल लोकांच्या मनात आज खूप संताप आहे, असे सांगून त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी  करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ बालाजी वाघमारे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR