40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeसोलापूरपाणीटंचाईमुळे तुळशी चा पाणीपुरवठा टँकरवरच

पाणीटंचाईमुळे तुळशी चा पाणीपुरवठा टँकरवरच

माढा : माढा तालुक्यातील बहुतांश गावांना कोणत्या ना कोणत्या जलसिंचन योजनांचा लाभ मिळाला आहे. परंतु तालुक्यातील तुळशी हे गाव सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ना शेतीसाठी कोणती सिंचन योजना, ना पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत जलपुरवठा. यातच गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे परिस्थिती खूपच विदारक झाली आहे.

जलस्रोत आटल्याने ३ सप्टेंबर२०२३पासूनच प्रशासनाने गावाला टैंकरने पाणीपुरवठा सुरू केला. जानेवारीपर्यंत दररोज ४० हजार लिटरने सुरू झालेला हा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला, फेब्रुवारीपासून त्यात वाढ होऊन आता दररोज टैंकरमार्फत ९२ हजार लिटर पाण्याचा पुरवठा प्रशासनाकडून केला जातो. जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावास शासन मान्यतेनुसार एक लाख २० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सातशे फुटांपर्यंत खोल असलेल्या विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवनचे काम पूर्ण करण्यात आले; परंतु या अंतर्गत घेतलेल्या विहिरीचा तळ उघडा पडला आहे.

तुळशी गावची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. दररोज साधारणपणे ३० हजार लिटर दूध गावातून संकलित केले जाते. गावात जवळपास सात हजार ५०० लहान मोठ्या जनावरांची नोंद आहे. दूध उत्पादकांसमोर जनावरांसाठीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आव्हान ठरत आहे. याबाबतही प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे गावकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुग्ध व्यवसाय हेच प्रमुख साधन आहे. यातच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. जनावरांना चारा डेपो,पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने होणे गरजेचे आहे. या उपाययोजना न झाल्यास जनावरांची संख्या घटून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ घेणार आहे.

संसद ग्राम योजनेत तुळशी गावाचा समावेश झाला होता, यावेळी हा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी बेंबळे (ता. माढा) येथील बंधाऱ्यातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु राजकीय साठमारीतून ही योजना गुंडाळली गेली. ती पुन्हा कार्यान्वित झाल्यास तुळशी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपू शकतो. यासोबतच सीना माढा उपसा सिंचन योजनेतील सात नंबरच्या वितरिकेवरून तुळशी पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याची सोय होऊ शकते, असे प्रामस्थांनी सांगितले.

तुळशी गावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सीना माढा उपसा सिंचन योजनेमध्ये गावाचा समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेतून गावातील पाझर तलाव, साठवण तलाव व ओळ्यावरील सिमेंट बंधारे भरून घेतल्यास तुळशी गावचा पाणीप्रश्न कायमचा दूर होऊ शकतो. असे तुळशीचे सरपंच डॉ. शरद मोरे म्हणाले. सप्टेंबर २०२३ पासून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या शासनाकडून २० लिटर प्रतिव्यक्ती पाप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने तळी भरल्यास भूजल पातळीत वाढ होईल. असे तुळशीचे ग्रामसेवक रामभाऊ मिटकल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR