20.2 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeसंपादकीयधमक्या उदंड जाल्या!

धमक्या उदंड जाल्या!

‘लेकुरे उदंड जाली’च्या चालीवर आता ‘बॉम्बच्या धमक्या उदंड जाल्या’ असे म्हणायची वेळ आली आहे. देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह अंतराळाच्या गप्पा मारण्यात मग्न आहेत. त्यांना आपल्या पायाखाली काय जळते आहे याची कल्पना आहे की नाही कोण जाणे! २०३५ सालापर्यंत भारताचे स्वतंत्र अंतराळ स्थानक असेल आणि ते ‘भारतीय अंतरिक्ष स्टेशन’ म्हणून ओळखले जाईल असा दावा सन्माननीय मंत्र्यांनी केला आहे. अंतराळात अंतराळस्थानक होईल तेव्हा होईल परंतु सध्या धमक्यांद्वारे विमानोड्डाणे जमिनीवर उतरवण्याच्या विकृतीला आळा कसा घालायचा हा मुख्य प्रश्न आहे. विविध भारतीय एअरलाइन्सच्या ८३ प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाली होती.

या सर्व विमानांना सुरक्षा प्रक्रियेचे पालन करत सुरक्षित उतरविण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या सुरक्षात्मक तपासणीत सर्व धमक्या अफवा असल्याचे निष्पन्न झाले. या धमक्यादात्यापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने फेसबुक व एक्सकडून डेटा मागवला आहे. धमक्यांचे हे सत्र अनेक दिवसांपासून सुरू असल्याने केंद्र सरकारने या प्रकरणी गंभीर पाऊल उचलत फेसबुकची पॅरेन्ट कंपनी मेटा व एक्स या सोशल माध्यम कंपन्यांशी संपर्क साधला आहे. जनहित लक्षात घेता धमक्या देणा-या दोषीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक डेटा उपलब्ध करून देणे तसेच सहकार्य करण्याचे आवाहन केंद्राने या कंपन्यांकडे केले आहे. सोशल माध्यमातून एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगोच्या प्रत्येकी २० विमानांना, अकासा एअरच्या १३, तर एलायन्स एअरच्या आणि स्पाईस जेटच्या प्रत्येकी ५ विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती? गत १४ दिवसांत विविध एअरलाइन्सच्या सुमारे २५० विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.

अशा धमक्या रोखण्यासाठी केंद्र सरकार व्यापक धोरण आखण्याची तयारी करत आहे. यात कायदेशीर उपाययोजनांबरोबर दोषींना ‘नो फ्लाय’ यादीत टाकण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मात्र अशा धमक्यांमुळे गत काही दिवसांत विमान कंपन्यांचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. शनिवारी विविध भारतीय एअरलाइन्सच्या ३३ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या सर्व विमानांना उतरवून करण्यात आलेल्या सुरक्षात्मक तपासणीत सर्व धमक्या अफवा असल्याचे निष्पन्न झाले. वाढत्या धमक्यांबाबत केंद्र सरकारने सोशल माध्यमांना योग्य खबरदारी बाळगण्याचे आणि चुकीची माहिती तात्काळ हटवण्याचे दिशा-निर्देश जारी केले आहेत. सोशल माध्यमांनी आपल्या कोणत्याही वापरकर्त्यांकडून करण्यात आलेल्या कोणत्याही गुन्ह्याची अनिवार्यपणे तक्रार करावी असे निर्देश माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत. यात भारताची एकता, अखंडता,

सार्वभौमत्व तथा सुरक्षेला धोका पोहोचवण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आयटी नियमांतर्गत सोशल माध्यमांना आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देणे आणि तपास संस्थांना ७२ तासांच्या आत सहकार्य करणे बंधनकारक आहे. आता प्रश्न असा आहे की, सर्व धमक्या अफवा ठरल्या म्हणून त्यात आपण आनंद मानायचा का? कारण या धमक्यांमुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. हा धोका केवळ विमानांपुरता मर्यादित न राहता त्याचे लोण अन्यत्रही पसरू शकते. फोनवर धमकी अथवा धमकीचा मेल आल्यावर काही काळ विमानतळावर गोंधळ उडतो, सुरक्षा संस्थांची धावपळ होते, तेवढा काळ प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो. विविध लोकांच्या विविध समस्या असतात, त्यांना ठरवल्याप्रमाणे काहीच करता येत नाही. विमानतळावर सावधगिरी बाळगली जाते, गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल असेही सांगितले जाते. तरीही समस्येवर उपाय सापडलेला नाही याची चिंता आहे. कॉल आणि मेल फसवे निघाले यात आनंद मानत स्वस्थ बसून चालत नाही. कारण पुन्हा येणा-या अशा कॉलकडे दुर्लक्ष करता येत नाही. असा कॉल आला की सा-या यंत्रणेला सतर्क व्हावे लागते. आजच्या डिजिटल युगात चोरटे, भुरटे आणि धमक्यांचे उद्योग करणारी मंडळी, सायबर चोरटे खूपच माजले आहेत.

पूर्वी एका खोडकर मुलाची ‘लांडगा आले रे आला’ ही गोष्ट सांगितली जायची. हा मुलगा विनाकारण ‘लांडगा आला रे आला’ अशी हाकाटी करायचा, लोक जमा व्हायचे आणि हाकाटीत तथ्य नाही हे लक्षात आल्यावर निघून जायचे. मुलाची हाकाटी द्यायची सवय सुरूच राहिली पण लोक आता त्याकडे दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी खरेच लांडगा आला, पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि व्हायचे ते नुकसान झालेच! मुलाचा हकनाक जीव गेला. म्हणून फेक कॉलकडे, अफवांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. निनावी कॉल अथवा मेल, धमक्या यामागे सुनियोजित कारस्थान आहे का, त्यामागचे मनसुबे कोणते, केवळ घातपाताचा इरादा आहे की घातपाताची भीती घालून अर्थकारणाला खीळ घालण्याचा डाव आहे असे अनेक प्रश्न निर्माण होतात! यासाठी सुरक्षा यंत्रणेला दक्ष राहावेच लागते. एखाद्या धमकीचा उगम कुठून झाला याचा छडा लावण्यात बराच वेळ जातो. या कालावधीत सुरक्षा संस्थाही अनिश्चिततेत असते,

प्रवासी हवालदिल असतात. विमान कंपन्या आणि प्रवाशांचे जे नुकसान झाले ते कसे भरून निघणार, शिवाय अशा प्रकारांमुळे जी भीती निर्माण झाली त्याचे काय, असे अनेक प्रश्न नाचू लागतात. निनावी कॉल अथवा मेल नित्याचेच झाले आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ‘कावळा बसायला अन् फांदी तुटायला’ गाठ पडली तर काय करणार? म्हणून अशा गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे आवश्यकच असते. सुरक्षा संस्था अथवा गुप्तहेर खात्याला कायम अलर्ट राहावे लागते. अखेर ती सुद्धा माणसेच आहेत. त्यांच्या मदतीसाठी आपण सगळ्यांनी चौकस राहणे गरजेचे आहे. आता तर हॉटेल्सना सुद्धा बॉम्बच्या धमक्या मिळू लागल्या आहेत म्हणे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR