30.5 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeनांदेडनांदेडमध्ये फर्निचरचे दुकान जळून खाक

नांदेडमध्ये फर्निचरचे दुकान जळून खाक

लाखोंचे साहित्य जळाले
नांदेड : प्रतिनिधी
माळटेकडीजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानास रविवारी दुपारी अचानक आग लागली. सायंकाळपर्यत ही आग ४ वाहनांच्या मदतीने विझवावी लागली. या आगीत दुकानातील लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

माळटेकडीजवळील नूर चौकात फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानास रविवारी दुपारी अचानक आग लागली. काही वेळातच आगीचा भडका उडाला. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन दलाच्या बम्बांच्या मदतीने आग विझविण्यासाठी कसरत करावी लागली. सायंकाळपर्यत वाहनांच्या अनेक फे-या करून दुकानाची आग विझवावी लागली, असे अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी सांगितले. आगीचे लोळ आणि धूर दूरपर्यत दिसून येत होता. रस्त्यावरच हे दुकान असल्याने नागरिक व व्यापा-यांची धावपळ उडाली.

ही इमारत दोन मजली होती. या इमारतीत सोपा बनवण्यासाठी लागणारे सोपा फोम, रेग्जिन व सोफा कापड भरगच्च भरून ठेवलेले होते. त्यामुळे आगीने रुद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता लक्षात घेता तिसरे पथक व चौथे पथक आगीवर पाचारण करण्यात आले. चार अग्निशमन वाहनांसह अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते. सर्व वाहनांच्या जवळपास ७ फे-या अशा एकूण २८ फे-या करून पाणी मारत आग अटोक्यात आणली. या आगीत ४० लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, साजिद, गिते, ताटे, शिंदे, पवळे, किरकन, वाहन चालक नरवाडे, तोटावर, टारपे, ताटे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR