लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्य वतीने महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विभागीय १०० वे नाट्यसंमेलन लातूर येथे होत आहे. यानिमित्ताने आयोजित भव्य नाट्यदिंडीने गंजगोलाई परिसर दुमदुमून गेला होता. लोकवाद्यांच्या निनादात पारंपारिक वेशभूषेतील लोककलावंत या नाट्यदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होते. ढोल-ताशांच्या गजरात विविध लोककलांचे याठिकाणी सादारीकरण केले. ते पाहायला मोठ्या संख्येने नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.
प्रारंभी गंजगोलाई येथील जगदंबा पूजनानंतर नटराजाची पालखी मार्गस्थ झाली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, अतिरिक्त्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, भरत जाधव, संकर्षण क-हाडे, विजय गोखले, अभिनेत्री स्पृहा जोशी, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संगीता टकले, नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर, शैलेश गोजमगुंडे, संजय आयाचित यांच्यासह विविध कलाकार, अधिकारी व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिका-यांची या नाट्यदिंडीला उपस्थिती होती. नाट्यदिंडीत वारकरी वेशभूषेतील पथकाने टाळ-मृदुंगाच्या गजरात काढलेल्या दिंडी लक्षवेधी ठरली. तसेच यामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी मृदुंगाच्या तालावर फुगडी घालत नाट्यदिंडीत आपला सहभाग नोंदविला. वासुदेव, गोंधळी, गुगळ आणि पोतराज यासारख्या पारंपरिक संस्कृतीची छापही नाट्यदिंडीत पाहायला मिळाली. यामुळे उपस्थितांना लातूरची पारंपारिक सांस्कृतिक समृद्धी अनुभवायला मिळाली.
नाट्यदिंडीत सहभागी झालेल्या पथकांनी गंजगोलाई परिसरात आपल्या कलेचे सादरीकरण केले. त्याला उपस्थित नागरिकांनी भरभरुन दाद दिली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नाट्यदिंडीत सहभागी झालेल्या विविध पारंपारिक कलाकारांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. गंजगोलाई येथून सुरु झालेली नाट्यदिंडीत महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दयानंद महाविद्यालय येथे आल्यानंतर या नाट्यदिंडीचा समारोप झाला.