महायुतीत तिढा कायम, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच
मुंबई : प्रतिनिधी
महायुतीत काही जागांचा गुंता अद्याप कायम आहे. मात्र, एक-एका जागेवर मार्ग काढत महायुतीची चर्चा पुढे सरकत आहे. आता कल्याणची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनाच सोडण्यात आली. मात्र, ठाण्यावर भाजपचा दावा कायम आहे. तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे या मतदारसंघाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र, चर्चेनुसार ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर शिवसेनेकडे, तर साता-यासह सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ भाजपला मिळू शकतो. मात्र, नाशिकवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही दावा आहे. दरम्यान, नाशिक राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीत आणखी ब-याच जागांवर खल सुरू आहे. राष्ट्रवादीला जवळपास ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खरी रस्सीखेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरू आहे. आतापर्यंत ब-याच जागांचा तिढा संपलेला आहे. परंतु मोजक्याच जागां आणि तेथील उमेदवारांवरून खल सुरू आहे. राष्ट्रवादीला साता-याच्या बदल्यात नाशिक मिळू शकते. परंतु शिवसेना शिंदे गट ही जागा सोडायला तयार नाही. त्यातच भाजपही या जागेवर आग्रही आहे. याशिवाय सिंधुदुर्ग-रत्नागिरी जागेवरूनही भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. परंतु तिकडे राणे तयारीला लागल्याने ही जागा भाजपलाच सोडावी लागणार आहे.
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला असून, येथून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लढणार आहेत. ठाण्याबाबतही शिंदे सेनेचा आग्रह आहे. परंतु योग्य उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावावर एकमत आहे. परंतु ते निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. योग्य उमेदवार मिळत नसल्याने ठाण्याचा तिढा सुटत नाही.
ठाण्यातून संजीव नाईक मैदानात?
आता भाजपचे संजीव नाईक यांना शिंदे गटाच्या शिवसेनेत घेऊन मैदानात उतरवावे, असा प्रस्ताव समोर आला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघही शिवसेनेलाच मिळू शकतो. त्यामुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे, पालघरमधून राजेंद्र गावित लढू शकतात. याशिवाय मुंबई उत्तर-पश्चिम मुंबईची जागाही शिंदेंकडे जाणार असून छ. संभाजीनगरही शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भिवंडी, सांगलीवरून
मविआतही जुंपली!
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर करून सांगली लोकसभेची जागा बळकावल्याने व भिवंडीची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे काँग्रेस पक्षातला असंतोष वाढतच चालला आहे. माजी मंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेतली असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ही काळया दगडावरची रेष असून, त्यात कोणताही बदल होणार नाही, असे ठणकावले. दरम्यान भिवंडीतील काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढवणारच, असा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत.