लातूर : निवडणूक डेस्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभेसाठी प्रचाराचा धुराळा उडताना बघायला मिळाला होता. आता सत्ता स्थापण्याच्या पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या गोटात तर ‘आकड्यांचाच’ गेम करण्याच्या दृष्टीने प्रचंड घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत सत्ता स्थापन केली तरी आपण त्यांच्यासोबत असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गटातही काहीतरी शिजतंय, असा अंदाज आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलेला बघायला मिळतोय. महाविकास आघाडीच्या गोटातून अतिशय महत्त्वाची माहिती येत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांना आश्रय देण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरी झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे बंडखोर उमेदवार विजयी होऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. अपक्ष आणि बंडखोर विजयी होऊ शकतील अशा उमेदवारांवर पुढच्या सरकारसाठी मदत घ्यावी लागू शकते म्हणून सर्व राजकीय पक्षांकडूनही चाचपणी करण्यात येत आहे.