देवणी : प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिक केंद्रंिबदू मानून आम जनतेच्या विकासासाठी काँग्रेसच्या हाताची आम जनतेला साथ राहिली आहे. विधानसभेच्या चालू निवडणुकीत काँग्रेसने आपली पंचसूत्री जाहीर केली आहे. महालक्ष्मी, समानतेची हमी ,कृषी समृध्दी, कुटुंब रक्षण व युवकांना शब्द या पंचसुत्रीतून महाराष्ट्राचा विकास साधला जाणार आहे.
यासाठी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन कर्नाटकचे मंत्री तथा बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंड्रे यांनी देवणी येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले.महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ शनिवारी देवणी येथे सभा पार पडली. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जेष्ट नेते मल्लिकार्जुन मानकरी, हमीद शेख, विजयकुमार पाटील, माजी खासदार सुधाकर श्रृंगारे, उमेदवार अभय साळुंके,अरंिवद भातांब्रे, बस्वराज पाटील नागराळकर, संजय शेटे, अंबादास जाधव, पंकज शेळके, दिलीप पाटील नागराळकर, अजित माने, पंडीत धुमाळ, धर्माजी सोनकवडे, अविनाश रेश्मे, मंहमंदरफी सय्यद, अजित बेळकोणे, यांची प्रमुख उपस्थिती होती
सेवेचे व्रत चालुच राहील : साळुंके
उतणार नाही मातणार नाही. घेतला वसा मी टाकणार नाही.या निवडणुकीचा निकाल काहीही असो पण जनसेवेचे घेतलेले व्रत चालुच राहील असे अभिवचन काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांनी व्यक्त केले. शेतकरी, कष्टकरी, यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसला मतदान करा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोयाबीनला ७ हजारांचा भाव मिळणार असल्याचे सुतोवाच यावेळी करताच मतदारांनी टाळ्याचा कडकडाट केला.
दलित नेत्याचा अपमान समाजबांधव सहन करणार नाहीत : शृंगारे
माझ्या खासदारकीच्या काळात व गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माझा अपमान विद्यमान आमदारांनी वेळोवेळी केला ,माझी पिळवणूक केली. दलित पुढे जाऊ नये त्यांची भावना असावी म्हणून त्यांनी माझ्याशी असे वर्तन केले. घडली हकीकत मी आता समाजापुढे ठेवत आहे. समाज बांधव आता माफ करणार नाहीत. त्यांचा राग मतपेटीतून दिसेल, असा विश्वास माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केला.