लातूर : प्रतिनिधी
१७ वर्षीय २ अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन व निलंगा पोलीस स्टेशन येथे २ तक्रारी दाखल होत्या. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने २ दिवस हैदराबाद शहरात मुक्काम करून २ अल्पवयीन मुली व त्यांचे सोबत २ आरोपींना ताब्यात घेतले. तर एका अल्पवयीन मुलीस वांगी ता. जि. नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले. मिळून आलेल्या मुली व आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
मागील १ वर्षापेक्षा जास्त कालावधीत पोलीस स्टेशनकडून संबंधित मुलींचा शोध सुरू होता. तसेच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेले बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त होती. वरील पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीबाबत पोलीस स्टेशनसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून समांतर तपास करण्यात येत होता. गुप्त व तांत्रिक माहिती संकलन व विश्लेषणाचे आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या टीमने अल्पवयीन मुलींचा हैदराबाद व नांदेड येथे शोध घेण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सूर्यवंशी, पोलिस अमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार वंगे व लता गिरी, चालक मणियार यांनी पार पाडली आहे.