इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानचे तुकडे-तुकडे करा अशी मागणी संसदेत एका खासदारानेच नाही तर शरीफ यांच्या मंत्र्याने सुद्धा केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पाकिस्तानमधील अनेक भागात विकास होत नसल्याने असंतोषाचे लोण पसरले आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत शाहबाज शरीफ सरकारची चिंता वाढली आहे. शहबाज यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा पक्ष पीपीपीने २ वेगवेगळ्या प्रांताची मागणी केली. भुट्टो यांच्या पक्षाच्या खासदाराने पंजाब तर शाहबाज सरकारमधील मंत्र्याने खैबर-पख्तूनख्वा हा प्रांत विभाजीत करण्याची मागणी केली. अर्थसंकल्पावर बोलताना सरकारमधील धार्मिक खात्याचे केंद्रीय मंत्री सरदार मुहम्मद युसूफ यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये हाजरा राज्य तयार करण्याची मागणी केली. तसेच पीपीपीचे सय्यद मुर्तजा महमूद यांनी पंजाबच्या विभाजनाची मागणी केली. दक्षिण पंजाब हे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी त्यांनी केली.
सध्या अधिकृतपणे पाकिस्तानमध्ये पंजाब, सिंध, खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि गिलिगिट-बालिस्टान हे प्रांत आहेत. पीओके आणि इस्लामाबादला केंद्राच्या अखत्यारीत ठेवण्यात आले आहे. पंजाब पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. तर सिंध हा आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम प्रांत मानण्यात येतो. बलूचिस्तान आणि खैबर हे दोन प्रांत पाकिस्तानातील सर्वात अशांत राज्य मानण्यात येतात. बलूचिस्तान आणि खैबर या दोन्ही राज्यात स्वातंत्र्य चळवळीने उग्र रुप धारण केले आहे. खैबर प्रांताला विभाजीत करून हाजरा हा भाग वेगळा करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारमध्ये चिंता वाढली आहे.