लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह परिसरात रविवारी सांयकाळी अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या २० मिनीटात जोरदार पावसाने झोडपले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव सुरु आहे. या पावसाने यात्रा महोत्सवात एकच धावपळ झाली. विशेष म्हणजे इफतारची वेळ, होळीचा सण साजरा करण्याची वेळ आणि पावसाच्या हजेरीने एकच धांदल उडाली.
यंदा ऑक्टोबरहीटने घामाच्या धारा निघाल्या. नोव्हेंबरमध्येही उन्हाचा चटका होता. डिसेंबरमध्ये थंडी जाणवलीच नाही. जानेवारी महिनाही उन्हातच गेला. फेब्रुूवारीमधील चटक उन्ह त्रासदायक ठरले. मार्चची सुरुवातही उन्हाच्या चटक्याने झाली. गेल्या आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील हवामानात बदल झाला होत्.ाा. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली होती. रविवारी सकाळी उन्हाचा चटका होता. तापमानाचा पारा ३६ अंशाच्या जवळपास होता. दुपारी ३ वाजल्यापासून आकाशात ढगांची गर्दी झाली होती. उन्ह-सावल्यांचा खेळ सुरु होता. लातूर शहर व परिसरात सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह मोठा पाऊस सुरु झाला. रोजा इफतारची वेळ, होळी पेटण्याची वेळ आणि पावसाचे आगमन यामुळे एकच तारांबळ उडाली. काही ठिकाणी होळी पेटली होती. पावसामुळे व्यत्यय आला. पाऊस आल्यामुळे काही ठिकाणी होळी पेटविण्यास उशिर झाला. पाऊस थांबल्यानंतर होळी पेटविण्यात आली.
अचानक पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट, विजायांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थाचा यात्रा महोत्सव सुरु आहे. रविवारी कुस्त्या होत्या. कुस्त्यांचा फड रंगलेला होता. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होती. अचानक पाऊस सुरु झाल्याने यात्रा महोत्सवात एकच धावपळ झाली. पाऊस २० ते २५ मिनीटांचाच होता. परंतु, एवढा मोठा होता की, शहरातील सर्वच गटारी तुंबल्या. गटारींतील कचरा, घाण रस्त्यावर आली. सखल भागात पाणीच पाणी साचले. शहरातील नांदेड रोडवरील सर्वच गटारी तुंबून गटारीतील घाण पाणी, कचरा, प्लास्टीकच्या कॅरीबॅगचा कचरा रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली होती. या पावसाने शहरातील छोट्या व्यापा-यांची धावपळ झाली. मार्केट यार्डातील शेतमाल या पावसाने भिजून नूकसान झाले.