33.9 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतिढा सुटेना, सुपारी फुटेना!

तिढा सुटेना, सुपारी फुटेना!

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असताना व त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असतानाही राज्यातील महायुती व महाआघाडी थेट रणांगणात भिडलेले पहायला मिळण्याऐवजी अद्याप खलबतखान्यातच दंग असलेले पहायला मिळतायत. पहिल्या टप्प्यात राज्यात विदर्भातील पाच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. भाजपने नागपूरमधून नितीन गडकरी व चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

मात्र अद्याप भंडारा-गोंदिया, अमरावती, गडचिरोली-चिमूर, रामटेक या मतदारसंघांसाठीचे महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. गडचिरोली-चिमूरच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे. रामटेकवर शिंदे गटाचा दावा असला तरी भाजपला ही जागा हवी आहे. अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेते व पदाधिका-यांचाच विरोध असल्याने अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. सध्या भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला चार सौ पारच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या लक्ष्यपूर्तीसाठीच शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता राज ठाकरेंची मनसे या पक्षांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसने महाविकास आघाडीची मोट बांधून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठीचे बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कागदावर महायुती व महाआघाडीसाठी बेरजेचे दिसत असलेले राजकारण प्रत्यक्ष जागावाटपात मात्र प्रचंड डोकेदुखीचे ठरत असल्याने ते वजाबाकीचेच राजकारण ठरणार की काय अशीच शंका निर्माण होते आहे. महायुतीत भाजपचा फॉर्म्युला जागावाटपात अंतिम शब्द ठरेल असा पक्षश्रेष्ठींचा अंदाज असावा. मात्र, शिंदे व अजित पवार यांनी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा हट्ट अद्याप तरी कायम ठेवल्याने महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नाही. त्यातच आता महायुतीत मनसेची एन्ट्री झाल्याने जागावाटपाच्या तिढ्यात नवे ट्विस्ट निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजपने राज्यातील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी अद्याप शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी व आता मनसे यांची उमेदवारी यादी निश्चित होऊ शकलेली नाही आणि या तिढ्यामुळे भाजपच्या उर्वरित उमेदवारांची यादीही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या दिल्ली वा-या सुरूच आहेत.

शनिवारी महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत होणा-या बैठकीत महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्यावर निर्णय होण्याची आशा महायुतीच्या नेत्यांना आहे. महायुतीत नाशिकच्या जागेवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता मनसे या चारही पक्षांची दावेदारी आहे. रामटेक, कोल्हापूर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच चालू आहे. धाराशिव, गडचिरोली व सातारा जागेवरून भाजप व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. माढ्यात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे मोहिते पाटील यांनी उघड-उघड विरोधी भूमिका घेतली आहे. भाजपने उमेदवार न बदलल्यास आपला उमेदवार रिंगणात उतरवू अशी भूमिका मोहिते-पाटील गटाने घेतली आहे. तर बारामतीत शिंदे गटाच्या विजय शिवतारे व भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये मतैक्य होत नसल्याने भाजपचा सोलापूरचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. साता-यावर अजित पवार दावा सांगत आहेत व उदयनराजे उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. मात्र, उदयनराजेंना उमेदवारी देण्यास साता-यातील स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे.

हा तिढा पाहता भाजप सातारच्या जागेसाठी माढा अजित पवारांना सोडण्याचा तोडगा स्वीकारण्याची शक्यता आहे पण त्याबाबत अंतिम निर्णय दिल्लीतच होणार हे स्पष्ट आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहे तर रामटेकची जागा आपल्याकडे घ्या, असा भाजप नेत्यांचा फडणवीसांवर दबाव आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवायचे आहे पण शिंदे गट आपली दावेदारी सोडण्यास तयार नाही. मुंबईतील जागांबाबतही शिंदे गट व भाजपमध्ये अशीच रस्सीखेच आहे. भाजपला मुंबईत जास्तीत जास्त जागा हव्या आहेत व शिंदे गट त्या सोडण्यास तयार नाही. त्यात आता मनसेच्या एन्ट्रीने मुंबईतील जागावाटपाचा तिढा आणखीच क्लिष्ट होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतही सांगली, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई व भिवंडी या मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला आहे. जालन्याच्या जागेसाठी काँग्रेस व शिवसेना दोघेही आग्रही आहेत. तर मुंबईत काँग्रेसला किमान दोन जागा हव्या आहेत. सांगलीत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत.

शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसने नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली व रामटेकचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, चंद्रपूरच्या जागेबाबत काँग्रेस अंतर्गतच उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. धानोरकर यांच्या पत्नी व वडेट्टीवार यांच्या कन्येत उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. भाजपने मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली असली तरी माजी खासदार हंसराज अहीर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एकंदर काय तर महायुती व महाआघाडीने एकमेकांना टक्कर देण्यासाठी बेरजेचे राजकारण म्हणून जास्तीत जास्त पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न केला असला तरी जागावाटपाच्या वाटाघाटीत ही बेरीज वजाबाकी ठरून तिढेच निर्माण होत आहेत. त्यातून जागावाटप वरचेवर लांबणीवर पडते आहे आणि स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचेच वातावरण आहे. थोडक्यात दोन्ही आघाड्यांची स्थिती तिढा सुटेना, सुपारी फुटेना अशीच झाली असल्याने निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी कधी सुरू होणार याची प्रतीक्षाच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR