शिरूर अनंतपाळ : गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका तालुक्यातील शेतक-यांना बसला. खरीप पिकांचे नुकसान होण्याबरोबरच नदी-नाल्यांच्या काठावरील शेतजमीन खरडून गेल्याने अनेक शेतक-यांच्या उत्पादनक्षम जमिनीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शासनाने विविध मदतीच्या घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्ष लाभ मिळताना अनेक शेतक-यांच्या पदरी निराशाच पडल्याची स्थिती आहे. अतिवृष्टीमुळे काही शेतक-यांचे १०० टक्के नुकसान झाले असतानाही सरसकट मदतीच्या निकषामुळे प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत मदत अपुरी ठरल्याची शेतक-यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, नुकसान झालेल्या पिकांचा पीकविमा मिळेल, अशी अपेक्षा असतानाही अनेक शेतकरी अद्याप विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पुरामुळे बुजलेल्या विहिरींमधील गाळ काढण्यासाठी शासनाने ३० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यावर केवळ १५ हजार रुपयेच जमा झाल्याने शेतक-यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे घोषणा आणि प्रत्यक्ष मिळणारी मदत यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शासनाकडून मदतीच्या घोषणा होत असल्या तरी त्या शेतक-यांच्या बांधापर्यंत आणि पूर्ण स्वरूपात पोहोचण्याची गरज आहे. नुकसानीचे वास्तव मूल्यांकन करून १०० टक्के नुकसानग्रस्तांना योग्य मदत, प्रलंबित पीकविमा आणि विहिरींच्या गाळ काढणीची पूर्ण घोषित रक्कम मिळावी.
















