पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (ठाकरे गट) मोठ्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नव्या नेत्यांना नाराज न करण्याचे धोरण ठाकरे गटाने अमलात आणल्याचे चित्र समोर आले आहे. पुण्याचे दबंग नेते वसंत मोरे यांची शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड करण्यात आली आहे. तर वरुण सरदेसाई, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना देखील मोठी जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे आता विधानसभेला यांना आमदारकीचे तिकिट मिळणार की नाही? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
सचिवपदी संजय लाखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ललिता पाटील, मुकेश साळुंके, वसंत मोरे यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे टू शिवसेना व्हाया वंचित असा प्रवास राहिलेल्या वसंत मोरे यांना हडपसरमधून तिकिट मिळणार का? अशी चर्चा देखील होताना दिसत आहे.
आज माझी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ‘शिवसेना’उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब यांच्या आदेशानुसार माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसाहेब, शिवसेना खासदार संजय राऊतसाहेब आणि संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिरसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नेमणूक करण्यात आली, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली.