पूर्णा : शहरातून हिंगोली व नांदेडकडे जाणा-या रेल्वे लोहमार्गावरील गेटवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून अडचणींचा सामना करणा-या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सदर उड्डाणपुलाचे काम महामार्ग क्र. २४९ वर रेल्वे गेट क्र. १७६ अ आणि गेट क्र. १३४अ दरम्यान सुरू आहे. हे काम महारेल कॉपोर्रेशनमार्फत २०१९ साली सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी एकूण १२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रारंभीच्या कंत्राटदाराने हलगर्जीपणा करत निकृष्ट दर्जाचे ९ पिल्लर उभारल्याने जे नंतर तोडण्यात आले. त्यानंतर नव्या कंत्राटदाराला हे काम सोपवण्यात आले. त्यामुळे कामाच्या कालावधीत वाढ झाली असली, तरी सध्या काम जलदगतीने सुरू आहे.
या उड्डाणपुलाचा पूर्णा शहरात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. हा पुल शहरातील प्रमुख वाहतूक रस्ता ठरणार आहे. सध्या भुयारी मार्ग वापरला जात आहे, मात्र तो खराब झाल्यामुळे आणि पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराची वाहतूक सुलभ होईल, वेळेची बचत होईल तसेच अपघातांचा धोका देखील कमी होईल. पुलाचे स्ट्रक्चरल काम, स्लॅब लावणे, डांबरीकरण आणि सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिक उत्सुकतेने पुलाच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. येत्या काही महिन्यात वाहतुकीस मार्ग मोकळा होईल अशी प्रशासन आणि नागरिकांची अपेक्षा आहे.