लातूर : प्रतिनिधी
३१ मार्च उलटूनही अद्यापही शहरातील काही मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर थकीत ठेवला आहे. अशा मालमत्ताधारकांविरुद्ध लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ताधारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून दि. ३ एप्रिल रोजी शहरातील टिळकनगर परिसरातील प्रतिमा मेडीकल स्टोअर्स सील करण्यात आले आहे.
मालमत्ताधारक हे थकबाकी कर भरत नसल्यामुळे त्यांचे दुकान शील करण्यात आले. वसुली पथक प्रमुख राज मोबिन, कर निरीक्षक तहेमिद शेख, क्षेत्रिय अधिकारी झोन डी चे बंडू किसवे, गफार शेख, दत्ता गंगथडे, अक्रम शेख, अकबर शेख, किशोर भालेराव सर्व वसुली लिपिक कर्मचारी मालमत्ता कर थकविणा-या मालमात्तधारकांविरुद्ध कठोर कारवाई करीत आहेत. दि. ३ एप्रिल रोजी टिळकनगरमधील नितीन शहा यांच्या प्रतिमा मेडीकल स्टोअर्सला सील ठोकण्यात आले आहे. मालमत्ता कर हाच लातूर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्या दृष्टीने सालसन २०२३-२४ वर्षात मनपातर्फे वसुली मोहिम राबविण्यात आली, ज्याअंतर्गत नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या व वेळोवेळी कर भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
त्यास बहुतांश मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देऊन आपल्या कराचा भरणा करुन मनपास सहकार्य केले. परंतु, ३१ मार्च उलटूनही अद्यापही काही मालमत्ताधारकाकडे कर थकीत आहे. थकबाकिदार यांना थकीत रकमेवर दरमहा व्याज सुद्धा लागत आहे. यापूर्वी वारंवार सूचना, नोटीस देण्यात आलेल्या असूनही थकबाकीदार मालमत्ताधारक कर भरत नसल्याचे दिसून आल्याने त्याच्यावर सक्तीची कारवाई करण्याची भुमिका महापालिकेने घेतली आहे. याबाबत थकबाकिदार मालमत्ताधारकाÞवर मालमत्ता अटकावणी (जप्ती) सारख्या कडक कार्यवाही करण्याच्या सुचना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. तसेच थकबाकिदार मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकित कर आजच भरुन जप्तीसारखी होणारी कार्यवाही टाळावी व मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी नागरिकांना केले आहे.