धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा खासदारकीचा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या कळंब व बार्शी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या गळ््यातील सोन्याच्या चैन चोरट्यांनी लंपास केल्या. ही चोरीची घटना धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी दि. १६ एप्रिल रोजी दुपारी घडली. या प्रकरणी चोरट्यांच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म दाखल केला. फॉर्म भरताना त्यांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी धाराशिव शहरातून रॅली काढली. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हाथ साफ केला. कळंब तालुक्यातील लोहटा प. येथील प्रदीप रामदास यादव यांच्या गळ््यातील साडेसतरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून लंपास केली.
तसेच बार्शी तालुक्यातील धोत्रे येथील भास्कर रामचंद्र जाधवर यांच्या गळ््यातील २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरट्यांनी गर्र्दीचा फायदा घेवून लंपास केली. या प्रकरणी लोहटा येथील प्रदीप यादव यांनी दि.१६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.